जिल्हा बाळ संरक्षण कक्षाने थांबवला अल्पवयीन मुलीचा विवाह

नागपूर : २५ मे – नागपूर शहरातील बजाजनगर येथे होत असलेल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबविण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनला यश आले आहे. १६ वर्षीय मुलीचा उमरेड येथील एका मुलासोबत हा विवाह होणार होता.
उपरोक्त विवाहासंदर्भात चाईल्ड लाईन यांना माहिती प्राप्त झाली होती. ही माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना देण्यात आली. यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन जावध यांच्या आदेशानंतर पथक तयार करण्यात आले. पथकाने बजाजनगर येथील मुलीच्या घरी धडक दिली. मुलीच्या घरी लग्नाची धडपड सुरू होती. यावेळी पथकाने मुलीच्या विवाहाच्या पुराव्याची मागणी केली. नगरसेविका लक्ष्मी यादव यांनी कायद्याची माहिती दिली. पथकाला सहकार्य नाही केल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर घरच्यांनी मुलीच्या वयाचे पुरावे दिले. यावेळी, मुलीचे वय हे कमी दिसून आले. यावेळी पथकाने मुलीच्या आई-वडिलांकडून लग्नाच्या वयाचे नियम पाळण्यासंदर्भात हमीपत्र लिहून घेतले. पीडित मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात दाखल करण्यात आले. पथकात जिल्हा बालकल्याण अधिकारी मुश्ताक पठाण, सहा. पोलिस निरीक्षक थोरात, बाल संरक्षण अधिकारी साधना हटवार, अमरजा खेडीकर, चाईल्ड लाईनची चमू प्रतिनिधी पूजा कांबळे, सामाजिक कार्यकर्ता स्नेहा सोनटक्के आदींचा समावेश होता.

Leave a Reply