नागपूर : २५ मे – खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रं.)- खापरखेडा मार्गावर महाराजा लॉनजवळ मध्यरात्रीनंतर सव्वा वाजता दरम्यान भरधाव जाणाऱ्या कारने दोन दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात दोन तरुणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुरेश उपेंद्र चौधरी (२४, रा. जयभोलेनगर, चनकापूर), हर्षल रविशंकर बनोदे (२४, रा. चनकापूर) अशी मृतकांची नावे आहेत. तर नितेश शालिकराम पंचेश्वर (२४, रा.चनकापूर), प्रतिक राजेंद्र बनोद (२४, रा. चनकापूर), रिषभ मनोहर माटे (२४, रा. खापरखेडा) अशी जखमींची नावे असून, कारचालक संकेत अशोक ढोक (२४, रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. सदर घटनेत मृतक व जखमी दहेगाववरून चनकापूर येथे अँक्टिवा स्कूटी क्र. एम. एच. ४0 / ए. १0५५ व एम. एच. ४0 / बी. व्ही. 0४0९ ने घरी जात असताना अचानक मागून भरधाव येणार्या आय-ट्वेंटी कार क्र. एम. एच. ३१ / डी. सी. ८८२७ ने दोन्ही गाड्यांना जबरदस्त धडक देऊन भीषण अपघातात स्कूटी व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. लागलीच सर्व जखमींना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी युवकांवर उपचार सुरू आहेत. यातील एका जखमीची हालत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या भीषण अपघातात मृतक, जखमी, आरोपी, फिर्यादी सर्व तरुण वयोगटातील आहेत. सदर घटनेत आरोपी कारचालक हा नशेत गर्क असताना भरधाव वेगाने कार चालवित नियंत्रण सुटल्याने दोन्ही गाड्यांना मागवून धडक देऊन फरपटत नेले. दरम्यान, कार व स्कुटी मार्गाच्या डाव्या बाजूला आदळून जखमी बेशुद्धावस्थेत पडलेले होते. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. फिर्यादीचे नाव नितेश मुरलीधर वर्मा (२४, रा. चनकापूर कॉलनी) आहे. आरोपी कारचालक याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर घटनेतील आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक भटकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मेर्शाम व गोविंदा दहीफडे पुढील तपास करीत आहे.