उद्या होणार संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय आंदोलन

नवी दिल्ली : २५ मे – शेतकरी आंदोलन अजूनही सुरुच आहे. शेतकऱ्यांचे अनेक गट पंजाब आणि हरियाणामधून दिल्लीकडे कूच करत आहेत. आणि याचं कारण आहे २६ मे रोजी होणारं राष्ट्रीय आंदोलन. शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याने हे आंदोलन होणार आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सांगितलं की त्यांना या आंदोलनातून आता ताकद दाखवायची नाही. तर करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे एक प्रतिकात्मक आंदोलन असणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि पंजाबच्या क्रांतिकारी किसान संघटनेचे अध्यक्ष डॉ. दर्शन पाल म्हणाले, आम्ही शहरात, गावात आणि दिल्लीच्या सीमांवरही हे आंदोलन करणार आहोत. मात्र, आम्ही त्यातून आमची ताकद दर्शवणार नसून आमचा निषेध दर्शवणार आहोत. आम्ही काळ्या पगड्या, दुपट्टे किंवा कपडे परिधान करणार आहोत, तसंच गावागावांमध्ये आणि दिल्लीच्या सीमांवरदेखील मोदी सरकारचे पुतळे जाळणार आहोत.
सुरक्षित अंतर आणि करोना प्रतिबंधाचे इतर सर्व नियम पाळून आम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अशी गर्दी करण्याची गरज आहे का याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, सरकार आमच्या दुर्दशेची कोणतीही जबाबदारी घेत नाही, मात्र आमची प्रतिमा खलनायकी रंगवत आहे. त्यांना त्यांचा आधीचा प्रस्ताव सुधारण्याची गरज आहे. शेतकरी त्यांच्या योग्य मागण्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.
पंजाबमधल्या एका मोठ्या शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सुखदेव सिंग कोकरीकलम सांगतात की, ते विविध गावांमध्ये ग्रामसभा घेऊन करोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आंदोलनाच्या भविष्याबद्दल चर्चा कऱणार आहेत. मात्र, गावकरी कमी संख्येने का होईना, पण आंदोलन सुरुच राहायला हवं या मागणीवर ठाम आहेत. ते पुढे म्हणतात, सरकार करोनाच्या प्रादुर्भावाचं कारण म्हणून आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही दिल्लीच्या सीमांवर मोकळ्या जागेत आंदोलन करत आहोत आणि आम्ही आंदोलनकर्त्यांची संख्याही करोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन कमी केली आहे. २६ मे रोजी सुद्धा आम्ही ४००० हून अधिक लोक आंदोलनासाठी पाठवणार नाही. आंदोलनासाठी बसमधून जाणारेही त्या बसच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्केच असतील.

Leave a Reply