सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मुसलमानियत

ह्या पोराला अनुभव कमी आहे, ह्याच्या जागी दुसरा जास्ती अनुभवी असलेला मुलगा घे. आमची टॉप मॅनेजमेंट मला समजावणीच्या सुरात माणूस बदलविण्यासाठी सांगत होती आणि मी मात्र ठाम…
जो मुलगा वयाच्या बाविसाव्या वर्षी विविध दाखले देत, सेफ्टी चे डॉक्युमेंट्स तयार करु शकतो आणि ब्रिटिश पेट्रोलियम चा ज्याला साइटवर अनुभव आहे. मी पण हट्टाला पेटलो. म्हटले १२ लोकांच्या इंटरव्ह्यू नंतर ह्याला तिस-या राउंडमध्ये सिलेक्ट केला आहे. सगळे इंटरव्ह्यू चेक लिस्ट आॅन लाईन वेब वर आहेत. माझी पहिली चॉईस हाच् पोरगा आहे. बाकी तुम्ही सुचवाल तो कॅंडिडेट घ्यायला मी तयार आहे.
स्थान : अल्जेरिया – हस्सी मसौद – कंपनी जेजीसी कॉर्पोरेशन – जपानी कंपनी. सहारा वाळवंटाचे ठिकाणी.
जपानी मॅनेजमेंट तुमच्या कामात जास्त ढवळाढवळ करीत नाही. एका छोट्याश्या ना-नुकुर नंतर ह्या पोराला घे म्हणून आमच्या फ्रेंच मानव संसाधन विभागाने मला परवानगी दिली आणि हा पोरगेलासा “नसीम” सेफ्टी आॅफिसर आमच्या कंपनीत रुजू झाला.
उंचा पुरा, गोरा भर्रार, सरळ धारदार नाकावर अल्लानी बसवलेला लांबोळका चेहरा, काळे डोळे पण बोलके अन् डोळ्यात जरब, रुंद कपाळ आणि जेव्हा पुर्ण सेफ्टी युनिफॉर्म घालून चालतो तेव्हाचा त्याचा चालण्यातला आत्मविश्वास, अस्खलित इंग्रजी बोलण्याची अल्जेरियन ढब आणि त्याला बघितले की साइट वर सगळे कामगार आपले सेफ्टी किट, पाण्याच्या अडकवलेल्या बाटल्या एकदा परत खात्री करून, परत कामाला लागणार.
कामाचे शेड्युल महिनाभर आधी मागुन घेणार. त्यात वापरण्यात येणारी सर्व यंत्रे ११० व्होल्टेज ची मागायला प्रतिबद्ध करणार. लाईफलाईन च्या गाईड लाईन्स व्यवस्थित पणे वेगळी सेफ्टी मिटींग घेवून सब कॉन्ट्रॅक्टर ला अवगत करून देणार आणि कुठलीही सबब न ऐकता, सर्व करवून घेणार.
(लाईफलाईन उंचावर कामं करण्यासाठी, कामगार पडु नये म्हणून कामगार सेफ्टी हार्नेसने स्वतः लाईफ लाईन ला हुक करतात. जेणेकरून कामं करताना चुकुन पडले तरीही वरचेवर राहतात आणि जमिनीवर आपटून मृत्यू होत नाही. इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन मध्ये ह्याला असाधारण महत्त्व आहे)

एकंदर मॅनेजमेंट ला अवगत करून नसीम ला घेतले. निवड चुकली नाही ह्याचे समाधान होते. कारण पेट्रोलियम फिल्डवर एक छोटीशी दुर्घटना – अख्ख्या साइटवरल्या सर्व अधिकारी लोकांची पार वाट लावतात. आणि जर एखादा दुर्घटनाग्रस्त मृत्यू झाला तर “सोनाट्रा” आमचा क्लायंट – सरळ सरळ तीन महिने कामं बंद ठेवायचा क्लॉज घालून ठेवतो. अशा वेळी समर्थ पणे हा पोरगा २४ तास कामं करायला तयार. पहिल्या पेक्षा गलेलठ्ठ पगार मिळाल्याने हा पोरगा आपले काम संपुर्ण लक्ष केंद्रित करून करायचा. फावल्या वेळात ह्याला कधीही टवाळक्या करत बघितले नाही तर हा पठ्ठा कंपनीच्या अद्ययावत जिममध्ये चांगले दिवसातले तासभर वर्कआऊट करायचा.
मी मुसलमान नसुन हिंदू आहे हे कळल्यावर, व्यक्तिगत रित्या इकडल्या तिकडच्या गप्पा सुद्धा सुरू केल्या. आणि सांगायचा की तुम्ही गैर मुसलमान म्हणून तुमच्याशी मोकळं बोलु शकतो तितका मोकळेपणाने मी स्वधर्मीयांशी सुद्धा बोलु शकत नाही.
त्याला स्वधर्माबद्दल – मुसलमान धर्माबद्दल अतिशय चीड. कधी ही ह्याच्याशी एकटे असताना बोलले की पहीली चार वाक्ये हा मुस्लिम धर्मातील चालीरीती ना शिव्या घालणार आणि मग बाकीचे बोलणे “Sorry boss, I should not talk like this but I really dislike my religion” असं म्हणत पुढचे आमचे बोलणे सुरू व्हायचे.
आज त्याने मला “सद्गुरू जग्गी” चे व्हिडिओ दाखवले म्हणाला मी ह्यांचा डायहार्ड फॅन आहे. “He speaks only truth” त्याच्या भाषेत.

मला हा आश्चर्याचा दुसरा धक्का. एक परदेशी मुसलमान जग्गी सद्गुरू ऐकतो आणि तारीफ करतो???? मी ऐकले नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त जग्गी सद्गुरू त्याला मुखोद्गत होता. फावल्या वेळात यूट्यूब चॅनलवर ऐकताना पुष्कळदा बघितले आहे.
ह्याच्या मनात आपल्याच धर्माबद्दल घृणा का बरं? मी पण कधी कधी विचार करायचो आणि कामाच्या रामरगाड्यात विषय पुढे सरकायचा नाही.
आज शुक्रवार, अर्धा दिवस सुट्टी. कामावरून एक वाजता आले, जेवले की आठवड्याभरची ताणून द्यायची. संध्याकाळी आळसावलेल्या चेह-याने अर्धा पाऊण तास दोन चार कप कॉफी पित सुस्तपणे घालवायचे हे माझे शुक्रवारचे रुटीन आणि नंतर तास भर चालणे रात्री जेवण आणि नंतर शनिवार पहाटे चार वाजता उठणे, साडे चार ला ब्रेकफास्ट पहाटे पाच वाजता आॅफिस….रामरगाडा सुरू…. नवीन आठवडा सुरू… असा आपला आठवडारंभ.
आज शुक्रवार आठवड्याभराची झोप झालेली, आळसावलेल्या चेह-याने मस्त पैकी ३-४ कप काॅफी प्यायलो आणि नित्यक्रमाने तासभर पायी जायला निघालो. तर नसीम आला, बोलला मी पण जॉईन झालो तर चालेल का?
म्हटले चालेल… चालता चालता तो आपणहून स्वतः च्या कौटुंबिक समस्या सांगु लागला. बहुतेक स्वधर्मियात तो गळा मोकळा करु शकत नव्हता म्हणून त्याने मला आज गाठले असावे. पुढे सांगू लागला, आम्ही ५ भाऊ बहिणी, मी सगळ्यात मोठा, एक धाकटा भाऊ आणि पाठच्या तीन लहान बहीणी. बोलला लहानपण आठवतं नाही. मी सतत कुठे कुठे काम करीत लहानपणापासून पैसा जमवायचा प्रयत्न करतोय आणि आईला पण हातभार लावतोय. आणि संसाराचा गाडा रेटतोय. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आम्ही जगलो. अतिशय गरीब परिस्थिती मध्ये दिवस काढले.

म्हटले वडील….. माझे वाक्य अर्धवट च् त्याने नेहमीप्रमाणे मनापासून शिव्यांची चळत धर्माच्या बापाला, मनापासून वाहिली. “मुसलमान धर्म हैवानियत चा अत्युच्च शिखर आहे” असे त्याचे म्हणणे. त्यानंतर धर्माने त्याने बापाला परत शिव्या हासडल्या. शिव्यांचा जितका अतिरेक करता येईल, तितका सगळा करून झाल्यावर – थोडा शांत, छोटासा पॉज…परत बोलता झाला.
आईला दरवर्षी एक एक संततीची भेट देऊन सातव्या वर्षी – तलाक-तलाक-तलाक बाप वेगळा झाला. आम्हाला पोटगी दाखल काही एक पैसा मिळायचा नाही. मी वयाच्या सातव्या वर्षी पासुन पैसा पैसा करीत वणवण फिरत आहे. आईने काही घरचे काम पकडले आहे “हाऊसकिपींगचे” म्हणजे आपल्या भाषेत झाडुपोछा. आईला ब-याच् लोकांनी पैशाअभावी वापरले असे सांगताना त्याचे डोळे दु:खद पाण्याने तरळले. पण कुटुंबासाठी ती खस्ता खात आमचा संसार जगवत होती. संसार तिनं जीवंत ठेवला होता. प्रत्येकात चांगले जीवन जगण्याची धग ती रुजवत होती. मी आणि आई दोघं धडपडत पैसा जमवून चांगलं भविष्य रंगवत होतो.
मी कसंबसं माझा “नेबोश सेफ्टी डिप्लोमा” केला आणि सुदैवाने आता इथपर्यंत आलोय. माझे सगळे भाऊ बहिणी शिकताहेत आणि मी त्यांना शिकवतोय. ह्याचा अभिमान आणि समाधान त्याचे चेह-यावर स्पष्ट झळकत होते.
मी विचारले मग आता वडील कुठे आहे? त्याने परत एक चळत शिव्यांची वडिलांना वाहिली – दोन बोल हैवानियत चे धर्माला ऐकवले आणि पुढे सांगू लागला. माझा बाप रंगीला बाप ५-६ वर्षाचे वर ह्याचे एक ही लग्नं टिकले नाही. सगळ्यांकडुन ४-५-४-५ मुलं ह्याला. आत्ता मागल्या महिन्यात ह्याने पाचवे लग्न केले. पोटगी दाखल हा एक ही पैसा देत नाही. इस्लामचा कायदा ह्याचे काही ही उखाडु शकत नाही. आता ह्या २५ वर्षे लहान असलेल्या बायकोकडुन परत हा ४-५-६ पोर पैदा करेल आणि मरतपर्यंत हा बाप असेच कारनामे करीत राहील आणि ही मुसलमान धर्माची काळीकुट्ट बाजु आहे. “अलिबाबा चाळीस चोर तसे एक अब्बा चाळीस पोर” असा आमचा धर्म आहे.
अरे म्हटलं तू जग्गी सद्गुरू चा फॅन कसा??? नसीम शांत – असीम शांतता – आसमंत काळोखाकडे झुकलेला. नसीम ने पाण्याची बाटली काढली , घोटभर पाणी प्यायला. बहुतेक त्याच्या मनात चलबिचल, ओपन करायचे की नाही?????
साहेब, तुमच्याकडून एक वचन पाहिजे आहे…. कोणते??? – मी
ही गोष्ट आपल्यातच् ठेवाल. म्हटलं दिले वचन कॅंपमध्ये कुठेही वाच्यता करणार नाही.
तो म्हणाला मी मुसलमान धर्म वाचला, अनुभवला पण आमच्या धर्मात राम नाही. एक दिवस युट्यूब वर सहज सद्गुरू जग्गी ना ऐकले आणि मी त्यांचा फॅन झालो. मी तद्नंतर “बौद्ध” धर्म स्वीकारला पण कुठे ही वाच्यता करू शकत नाही. मी मुस्लिम धर्म बदलून “बौद्ध” स्विकारला हे कळले जरी तर हे मुसलमान माझा शिरच्छेद करतील. पण मी मात्र बौद्ध धर्माचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. माझी विकेट उडालेली. मुसलमान धर्मात जन्मलेल्या लोकांना किती क्लिष्ट परिस्थितीतून जावे लागते. धड जगता येत नाही आणि मरता येत नाही.तुमची मजा घेत घेत धर्माचे सक्तिने पालन करायला लावणारा धर्म म्हणजे मुसलमान धर्म.
त्याला विचारले तुला गर्लफ्रेंड वगैरे कोणी नाही का????
तो म्हणाला – आमचे तीन वर्षे डेटिंग चालू होते आईला पण मुलगी पसंत होती. गोष्टी ब-याच पुढे गेल्या होत्या. सॅबातिनी सुंदर मनमिळाऊ, उंच सडपातळ गोरी आणि नाकी डोळी शार्प. आईला पसंत होती.
धीर केला, हिंमत बांधली कोणालाही सांगणार नाही वचन घेतले तिच्याकडून. हे सगळे सोपस्कार आटोपल्यानंतर तिला सांगितले,”सॅबी मी बौद्ध धर्म स्विकारला आहे. एक पत्नी म्हणून तू स्विकारला तर आनंद होईल, पण तू मुसलमान राहिली तरी मला हरकत नाही”
तिने एका झटक्यात आमची तीन वर्षाची रिलेशनशिप तोडली. म्हणाली तू जर बौद्ध धर्म स्वीकारला आहे तर आपल्या लग्नाचा प्रश्नच् नाही. सगळे इथंच् थांबवुया. तुझ्याशी लग्न म्हणजे आपल्या दोघांच्या जीवाला कायमस्वरूपी धोका. तिने नाकारले. काही दिवस खुप अस्वस्थ होतो. आता ती माझी अम्मी आहे, माझ्या बापाने तिला पटवले आणि मागल्या महिन्यात लग्न केले, तिच्याशी. माझा बाप म्हणजे.. असे म्हणुन त्याने परत एक चळत भर शिव्यांची लाखोली त्याने बापाच्या नावाने वाहिली.
पण आता तो सावरला दिसला ह्या धक्क्यातून.
सतत सद्गुरू जग्गी ऐकायचो आणि सद्गुरू जग्गी ने मार्ग दाखवला. आता ठरवले चांगली नौकरी आहे. आईला सुखात ठेवायचे, बहिण भावांना शिकवायचे, मोठे करायचे. २-३ वर्षात ब्रिटिश पेट्रोलियम इंग्लंडमध्ये जाऊन नौकरी करायची, भरपूर पैसा कमवुन आईच्या संसाराला चार चांद लावायचे. बापासारखे लग्न करून परत मुसलमानियत करायची नाही.
जग्गी सद्गुरू च्या प्रवचनांनी त्याच्यातला बुद्ध प्रत्यक्षात अवतरित केला होता. त्याच्यातल्या मुसलमानियतचा अंश सुद्धा लयाला गेला होता. अध्यात्मिक दृष्ट्या जरी तो प्रगत नसला तरी मानवतेच्या मार्गाला पांथस्थ……
असो अपना अपना धरम – अपना अपना करम……
आम्ही दोघेही बरेच् लांब आलो चालत चालत, काळोख झालेला, माघारी फिरलो आमच्या कॅंप चे दिवे दिसत होते दूरवर. कशा ही परिस्थितीत असा. मनातून जर चांगले करण्याची इच्छा असेल तर दूर कूठेतरी एखादा आशेचा दिवा लुकलुकत असतो.

भाई देवघरे

Leave a Reply