मादी अस्वल पोहोचले बाजारात, नागरिकांमध्ये खळबळ

भंडारा : २४ मे – सध्या कोरोनामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध असल्याने त्यांना घरात राहावे लागत आहे. मात्र वन्यप्राणी मुक्त संचार करीत आहेत. असाच मुक्तसंचार करीत एक मादा अस्वल गावातील बाजारपेठेपर्यंत पोहचली व झूडपामध्ये ठिय्या मांडला. याची माहिती ग्रामस्थांना होताच एकच खळबळ माजली. परंतु भंडारा वनविभागाच्या रॅपीड रिस्पॉन्स युनिटने तत्काळ घटनास्थळ गाठले व अस्वलाल गावात शिरू न देता जंगलाकडे जाण्यास जंगलाच्या दिशेने जाण्यास परावृत्त केले. तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर अस्वल परत गेल्यानेे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. सदर प्रकार पवनी तालुक्यातील अड्याळ गावालगतच्या किटाळी फाटा येथे घडला.

पवनी तालुक्यातील अड्याळ किटाळी परिसर जंगलास लागून असल्याने एक मादा अस्वल भरचौकातील बाजारपेठे जवळ असलेल्या झुडूपापर्यंत पोहचली. अस्वल आल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी भंडारा येथून रॅपीड रिस्पॉन्स युनिटने तत्काळ घटनास्थळ गाठले. प्रसंगी पथकातील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर जाळ्या लावून अस्वल गावात शिरणार नाही याची खबरदारी घेतली. प्रसंगी पर्यायी व्यवस्था म्हणून अस्वलाला बेशुध्द करण्याकरिता विशेष चमूही तयार ठेवण्यात आली होती. दरम्यान जेसीबीच्या मदतीने झुडूप तोडून व फटाके फोडून अस्वलाला झुडूपाबाहेर काढण्यात आले. सदर अस्वलाला चकारा गावानजीकच्या टेकडीच्या दिशेने हुस्कावून लावण्यात आले. तब्बल तीन तासाच्या परिश्रमांनतर गावातून अस्वल बाहेर गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सदर कारवाई उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, सहायक वनसंरक्षक वाय.बी. नागूलवार यांच्या मार्गदर्शनात भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांच्या नेतृत्वात रॅपीड रिस्पॉन्स युनिटचे अनील शेळके, निलेश श्रीरामे, ज्ञानीराम पातोळे यांच्यासह विनोद पंचभाई व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

Leave a Reply