मराठा आरक्षण प्रकरणी खा. संभाजीराजे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

कोल्हापूर : २४ मे – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या २७ मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.
संभाजी छत्रपती यांनी आज कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून या दौऱ्यामागची भूमिका विशद केली. माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. मराठवाडा आणि खान्देशात जाऊन तिथे समाजाची भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहे, त्याची चाचपणी केली पाहिजे. त्यासाठी मी 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मी या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. तर समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचीच आमची भूमिका आहे. पण या समाजाला कोणीही वेठिस धरू नये. समाजाची दिशाभूल होऊ नये हे आमचं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितलं. समाज अस्वस्थ आहे. हे मान्य आहे. पण कोरोना काळात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. आंदोलनापेक्षाही जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने समाज रस्त्यावर उतरणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
समाजाने 58 मोर्चे काढलेले आहेत. त्यातून सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. आता कितीवेळ लोकांना रस्त्यावर आणायचं? कोरोनाचं वातावरण आहे. त्यामुळे आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही, असं सांगतानाच सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

Leave a Reply