मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

आपल्या मनाची एकाग्रता

एकाग्रता म्हणजे मन केंद्रित करणे. एकाग्रता वाढली तर आपल्या मनाची स्थिरता वाढते आणि मन हे स्थिर झाले तर एकचित्त होऊन आपल्या मनाचे चिंतन वाढते आणि हे चिंतन वाढले की आपल्या मनात वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात, नव्हे वेगवेगळ्या कल्पना सुचतात, त्यामुळे आपोआप आपल्या कामाची गती वेग घेऊ लागते. आणि हाती घेतलेल्या कामात कुठलीच अडचण निर्माण होत नाही आणि आपण त्या कामात यशस्वी होतो.
आता ही एकाग्रता प्रत्येकालाच असते असे नाही. आपण काय करतो एकाच वेळी मनात वेगवेगळी कामे करण्याचा प्रयत्न करतो, परिणाम काय होतो तर एकही काम मार्गी लागत नाही आणि हाती काय लागतं तर शून्य. ही चूक का होते तर आपल्या मनात चाललेल्या विचारांचे वादळ. हे वादळ आपल्या मनात घोंगावत असत. हे वादळ आपले लक्ष विचलित करत. त्यामुळे आपण आपलं लक्ष एकाग्र करू शकत नाही.
काम करताना आपण नेहमी म्हणतो की, ‘माझं चित्त थाऱ्यावर नाही’, म्हणजेच तुमचं मन कोणत्याही गोष्टीवर एकाग्र नाही असं होत. याचा अर्थ असा की कधी कधी एखादं काम अपूर्ण राहत, मनात एकानेक कामे थैमान घालतात, म्हणजेच, कोणत्याच गोष्टीवर लक्ष एकाग्र नसणे, एखाद काम खूप घाईत होत व घाई झाल्यामुळे ते पूर्ण होत नाही तर त्यात अनेक चुका होतात. कामाची अचूकता साधता येत नाही. हे अचूकता साधता येते ती फक्त एकाग्रतेने. आज जो तो इतरांच्या चर्चा करायच्या मागे लागला आहे. हीच विनाकारण चर्चा न करता आपल्या स्वतःवर खर्च केली, स्वतःच्या श्वासावर साधता आली तर नक्कीच आपलं चित्त एकाग्र होईल. मनातले विचार कमी होतील, वाईट सवयी बदलतील, जीवनाचे नेमके ध्येय कळेल. तसेच वेळेचे महत्त्व कळून हाती घेतलेले कार्य अर्थपूर्ण होईल.
यावरून आपले आयुष्य यशस्वी करायचे असेल तर एकाग्रता महत्त्वाची आहे. तुमच्या दैनंदिन दिवसातले वीस ते पंचवीस मिनिटं ध्यान केले तर तुमच्या जीवनातअकल्पनीय असे बदल घडून येतील असे माझे ठाम मत आहे.

पल्लवी उधोजी

Leave a Reply