पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

चंद्रपूर : २४ मे – मोहफुल दारूविक्रीप्रकरणी धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दारूविक्रेत्यांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी रविवारी तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांची चौकशी सुरू असतानाच आकाश गरीबचंद मजोके या आरोपीने स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सावली पोलिस ठाण्यात घडली. लागलीच पोलिसांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सावली पोलिस गस्तीवर होते. तालुक्यातील किसाननगर येथून मोहफुलाची गावठी दारूची तस्करी केली जात असल्याची बाब गस्तीवरील पोलिसांना लक्षात आली. त्यांनी दारू तस्करांचा पाठलाग करून पकडले. त्यांची विचारपूस करीत असताना दारूविक्रेत्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्लयात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस ताफा किसाननगर येथे पोहचला. पण, पोलिसांच्या वाहनांवर अन्य दारूविक्रेत्यांनी दगडफेक केली होती. या प्रकरणातील आरोपी पसार झाले.
दरम्यान, रविवारी पसार आरोपींचा शोध घेवून आकाश गरीबचद मजोके, गरीबचद मजोके आणि अदन्यान मजोके यांना अटक केली. त्यांची चौकशी सुरू असताना आरोपी आकाशने बाहेर जाण्याचा बहाणा केला. पोलिस कर्मचार्यांच्या स्वच्छतागृहात जावून तिथे ठेवलेले फिनाईल त्याने प्राशन केले. तो अस्वस्थ दिसताच त्याला सावली ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर सामान्य रूग्णालयात हलविल्या गेले. सद्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती ठाणेदार रोशन शिरसाठ यांनी दिली. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी जबर मारहाण केली. शिवाय 50 हजार रूपयाची मागणीही केल्याचा आरोप दारूविक्रेत्या आरोपीने केला आहे.

Leave a Reply