नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीवर केला अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

नागपूर : २४ मे – मैत्रिणीला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन सधन घरच्या आरोपी युवकाने मैत्रिणीवर अत्याचार केला. तिचा विरोध टाळण्यासाठी त्याने तिला लग्नाचे आमिषही दिले. पण, युवतीने लग्नाचा तगादा लावताच त्याने नकार दिला. याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम जगदीश हुड (२८) रा. उमरेड रोड, दिघोरी असे आरोपीचे नाव आहे.
दिघोरी येथे राहणार्या २९ वर्षीय युवतीची उमरेड रोड दिघोरी येथे राहणार्या शुभम जगदीश हुड याच्याशी ओळख होती. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. काही दिवसांनी त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. युवतीच्या घरची परिस्थिती सामान्य असल्याने ती नोकरीच्या शोधात होती. शुभम तिला नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवायला लागला होता. शुभम स्वत: काहीही काम करत नाही. मात्र, तो सधन घरचा असल्याने तो युवतीला पैशांचीही मदत करीत होता. आरोपी शुभम वारंवार पीडित युवतीला बाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करू लागला होता. त्याने तिला लग्नाचे आमिषही दिले होते. पण, जेव्हा पीडित युवतीने त्याला लग्नाचा तगादा लावला तेव्हा त्याने तिला लग्नासाठी नकार दिला. अखेर फसवणूक झालेल्या युवतीने हिंगणा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली.

Leave a Reply