ऊर्जामंत्री आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर : २४ मे – राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर आज राज्यभरातील वीज कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले आहेत. सर्व प्रकारच्या संकटकाळात मग ते संकट कोविडचे असो की निसर्ग निर्मित संकट असो, सर्वात पुढे येऊन वीज विभागातील कर्मचाऱ्यांना आपली सेवा द्यावी लागते. तरी देखील राज्य सरकार त्यांना फ्रंटलाईन वर्कर मानायला तयार नाही. ऊर्जामंत्री आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना आजच्या आज तात्काळ फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे. ज्या वीज कर्मचाऱ्यांनी कोविड काळात रस्त्यावर उतरून आणि रुग्णालयांमध्ये असलेल्या कोविड वॉर्डमध्ये जाऊन वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, अशा वीज कर्मचाऱ्यांना देखील सरकार फ्रंटलाईन वर्करचा दर्जा नाकारत असेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महा विकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याप्रमाणे कोणताही मंत्री आपल्या कामाप्रती गंभीर नसल्याचा आरोप देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Leave a Reply