सुरक्षा दलाने केला डीएनएलच्या ६ बंडखोरांचा खात्मा

गुवाहाटी : २३ मे – सुरक्षा दल आणि आसाममधील डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए)च्या बंडखोरा दरम्यान आज सकाळी प्रचंड धुमश्चक्री उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाने डीएनएलएच्या सहा बंडखोरांचा खात्मा केला. या चकमकीत एक बंडखोर जखमी झाला आहे. या बंडखोरांकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे.
नागालँडच्या सीमेजवळ आसामच्या पश्चिमेकडील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात आज सकाळी ही चकमक झाली. कार्बी आंगलोंगमध्ये काही डीएनएलएचे बंडखोर लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दल आणि पोलिसांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं. हे सर्च ऑपरेशन सुरू असतानाच बंडखोरांनी सुरक्षा दल आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केला. काही तास दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू होता. त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकही घराबाहेर पडले नाहीत. या चकमकीत सहा बंडखोरांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
ठार करण्यात आलेल्या सहाही बंडखोरांकडील मोठ्या प्रमाणावरील शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चार एके-47 रायफल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या चकमकीनंतर मिचिबैलूंग येथे सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.
दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आवाहनानंतर उल्फा (आय)ने अपहरण केलेल्या ओएनजीसीच्या एका कर्मचाऱ्याला सोडलं आहे. तब्बल महिन्याभरानंतर या कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली आहे. रितूल सैकिया असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 21 एप्रिल रोजी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. 20 मे रोजी मुख्यमंत्र्याने या कर्मचाऱ्याला सोडण्याचं आवाहन केलं होतं. त्याला उल्फा (आय)त्या परेश बरुआने सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

Leave a Reply