नागपूर : २३ मे – ग्रामीण भागात कोरोना चाचणी व लसीकरणावर भर देण्यात यावा, तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा, असे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी या तालुक्यांचा दौरा केला. यावेळी तेथील आरोग्य सुविधा व लसीकरणाच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. कन्हान, देवलापार व पारशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉ. नितीन राऊत यांनी भेटी दिल्या.
कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची माहिती घेतली त्याचप्रमाणे कोरोना बाधित किती लोक आहेत व लसीकरण किती लोकांचे झाले, याचीही माहिती घेतली. रामटेक तालुक्यातील देवलापार या आदिवासीबहुल गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा पालकमंत्र्यांनी आज भेट दिली. यावेळी तेथील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. लसीकरणामुळे काही गैरसमजुती असल्याने लसीकरण कमी होत असल्याचे वृत्त असल्याने नागरिकांनी या भ्रामक कल्पना मनातून काढून टाकाव्या. लसीकरणामुळे कुणीही बिमार पडत नाही किंवा मृत्यू येत नाही. कोरोनापासून आपल्याला वाचायचे असेल तर लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी नागरिकांना सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तिसऱ्या लाटेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्या सुविधा आहेत. याची माहिती जाणून घेतली. लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान सुविधा तयार ठेवा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले.