कोल्हापूर : २३ मे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग लवकरच कोल्हापूरमधून फुंकले जाण्याची शक्यता आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापुरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल.
या बैठकीत संभाजीराजे समाजाची भूमिका जाणून घेणार आहेत. बैठकीनंतर संभाजीराजे समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करणार राज्याच्या दौऱ्याला सुरवात करणार असल्याचे समजते. संभाजीराजे यांनी यापूर्वीच आपण 27मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कोल्हापुरातील बैठकीत नक्की काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.