भाजीविक्री करणाऱ्या महिलेची भाजी फेकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर अखेर केली कारवाई

नागपूर : २३ मे – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात लॉकडाऊन लावण्यात आला. पण लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहासाठी भाजी विक्री करणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. या घटनेची दखल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही घ्यावी लागली. अखेर पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. त्यांचं दोन वर्षाचं इन्क्रिमेंट न देण्याचा आदेश काढण्यात आला.
नागपूरच्या जरीपटका भागातील कुशी नगर परिसरात एक महिला भाजी विक्री करत होती. खाकी वर्दीतील अधिकाराचा गैरवापर करत पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी त्या महिलेची सगळी भाजी आणि बाकी सामान रस्त्यावर फेकून दिलं. तिथल्या रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्याची ही कृती मोबाईलमध्ये कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. समाजाच्या दबावापोटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर अखेर नागपूर पोलिसांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई केली आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांच्या आदेशानुसार संतोष खांडेकर यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष खांडेकर यांचं दोन वर्षाचं इन्क्रिमेंट रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती नागपूर पोलिसांकडून देण्यात आलीय.

Leave a Reply