गोंदिया : २३ मे – आमगाव पोलिस ठाण्यातील कोठडीत असलेल्या आरोपीचा शुक्रवारी मृत्यू झाला. या आरोपीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ही कारवाई केली.
पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक महादेव जाधव, हवालदार खेमराज खोब्रागडे व शिपाई अरुण उईके यांचा निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. आमगावच्या जिल्हा परिषद शाळेतून दोनदा चोरी करणाऱ्या राजकुमार अभयकुमार वैद्य (वय ३०), सुरेश धनराज राऊत (वय ३१), राजकुमार गोपीचंद मरकाम (वय २२) व एक अल्पवयीन अशा चौघांना २० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. एक विधिसंघर्ष बालक असल्यामुळे त्याला सोडून तिघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. मुख्य आरोपी राजकुमार याची दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती खालावली. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.