बीजिंग : २३ मे – चीनच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये खराब हवामानामुळे १०० किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ जणांचा मृत्यू झाला. चीनची शासकीय वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, गांसु प्रांतात एक पर्यटन स्थळ असलेल्या यल्लो रिव्हर स्टोन फॉरेस्टमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना वेगवान वारे आणि हिम वर्षावाच्या आव्हानांचा सामना करावा लागला. या मॅरेथॉनमध्ये एकूण १७२ जण सहभागी झाले होते.
अधिकृत माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी मृतांची संख्या २१ झाली होती. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले अन्य १५१ जण सुरक्षित आहेत. त्यातील आठ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. शनिवारी दुपारी एक वाजता मॅरेथॉन मार्गावरील उंच भागातील २० ते ३१ किमी अंतरादरम्यानचे हवामान खराब झाले. या भागात जोरदार हिमवृ्ष्टी झाली आणि हवाही जोरात होती. वातावरणातील तापमान अचानकपणे कमी झाल्याने अनेक स्पर्धकांना त्रास झाला. काही स्पर्धक बेपत्ता झाल्याचे समोर आल्यानंतर स्पर्धा थांबवण्यात आली.
बाइयिन शहराचे महापौर झांग शुचेन यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासनाने बेपत्ता झालेल्या स्पर्धकांचा शोध घेण्यासाठी १२०० हून अधिक मदत आणि बचाव कार्याचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या भागातील तापमानात पुन्हा घट झाली. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य सुरू ठेवणे अधिकच आव्हानात्मक झाले.