नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी एक देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आले. त्यात अटक झालेल्या महिलेची पोलिसांनी तपासणी केली तेव्हा जे वास्तव समोर आले ते भयावह होते. सदर महिला नागपूर विमानतळावर विमानांमध्ये प्रवाश्यांना अन्नपुरवठा करण्याचे काम करीत असे कोरोनाने तिचे काम बंद पडले आणि पोट भरण्यासाठी तिला हा मार्ग पत्करावा लागला असे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली.
उद्योगधंदा गेला म्हणून पोट भरण्यासाठी गैरमार्गाचा वापर करणे हे रास्त आहे असे कोणीच म्हणणार नाही मात्र, रिकामे पोटचं माणसाला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करते हे वास्तवही नाकारता येणार नाही. सदर प्रकरणात ही महिला देहव्यापाराकडे वळल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षभरात अश्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण वाढले आणि २४ मार्च २०२० ला पंतप्रधानांनी देशभर लॉक डाऊन लागू केला. यात जे सुरक्षित नोकऱ्यांमध्ये किंवा स्थिर व्यवसायात होते त्यांचे तर निभले मात्र ज्यांचे या हातावर कमावून त्या हातावर खायचे असे होते त्यांचे अत्यंत वाईट हाल होते त्यातील अनेकांना आपले मूळ उद्योग सोडून दुसऱ्या उद्योगांकडे वळावे लागले. अर्थात प्रत्येकाचं उद्योगात प्रत्येकाला संधी मिळेलच असे नाही त्यामुळे मग अनेक बेकार अकारण वाममार्गाकडे वळले याकाळात सरकारसह सामाजिक संस्थांनीही शक्य ती मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केला मात्र आभाळच फाटले होते तेव्हा ठिगळ कुठे कुठे लावणार असा प्रश्न होता. त्यामुळे अनेक परिवार असे रस्त्यावर आले.
पहिल्या लॉक डाऊनमध्ये तर निभाळे पण दुसऱ्या लॉक डाऊनमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. या लॉक डाऊनला व्यापारी वर्गासह तळागाळातल्या नागरिकांचा ठाम विरोध होता मात्र सरकारलाही दुसरा पर्याय नव्हता. परिणामी लॉक डाऊन तर लावले गेले पण रस्त्यावर येणाऱ्यांना जाहीर केलेली मदत मिळू शकली नाही परिणामी त्यांचे हाल वाईटच आहेत. त्यातूनच असे प्रकार पुढे येत आहेत.
या प्रकारावर आता सरकारसह सर्वच संबंधितांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे. माणूस मुळातच गुन्हेगार नसतो मात्र त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते अश्या वेळी सरकारने आणि समाजाने अश्या व्यक्तींबाबत सहानुभूतीचे धोरण स्वीकारायला हवे त्याचबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी कोणालाही गुन्हेगारीकडे किंवा वाममार्गाकडे वळण्याची वेळ येऊ नये याबाबतही काळजी घेतली जायला हवी, आज ते खरोखरी गरजेचे आहे.
अविनाश पाठक