चेन्नई : २१ मे – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काल(गुरूवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांच्या सुटका केली जावी, अशी मागणी केली आहे.
स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “ राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा स्वीकार करावा आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा आणि त्यांच्या तत्काळ सुटकेसाठी आदेश द्यावा.”
तसेच, “तामिळनाडू मधील बहुतांश राजकीय पक्ष देखील सर्व सात आरोपींच्या तत्काळ सुटकेची मागणी करत आहेत. एवढच नाही तर तामिळनाडूच्या जनतेची देखील अशीच इच्छा आहे. या सात जणांनी मागील तीन दशकात बऱ्याच यातना सहन केल्या आहेत. असं देखील पत्रात म्हटलं आहे.”
नलिनी श्रीहरन, मुरुगन, संथन, एजी पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि पी. रविचंद्रन हे सात जण राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी आहेत.
दरम्यान, राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारीवल याची काल ३० दिवसांसाठीची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे.
आरोपी पेरारीवलन याच्या आईने सध्याच्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना पत्र लिहित ही सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली होती. पेरारीवलन करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्यांच्या गटात मोडत असल्याचं कारागृहातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर पेरारीवलनचे उपचार अद्यापही पूर्ण झाले नसल्याने त्याला उपचाराची गरज असल्याच्या कारणावरुन त्याच्या आईने या सुट्टीची मागणी केली होती. मागच्या वेळच्या त्याच्या सुट्टीमध्ये त्याला उपचार मिळू शकले नाहीत. कारण, करोना प्रादुर्भावामुळे हॉस्पिटलचे सर्व वॉर्ड्स करोना वॉर्डमध्ये रुपांतरीत कऱण्यात आले होते.