ममता बॅनर्जी आता मतदारसंघ बदलणार, भवानीपूरच्या आमदाराने दिला राजीनामा

कोलकाता : २१ मे – पश्चिम बंगालम विधानसभा निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चित करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता यांचेच जुने सहकारी आणि भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा अवघ्या 1 हजार 956 मतांनी पराभव केला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तृणमूल काँग्रेसची झाली. पण आता ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पाऊल टाकणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आमदारकी मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यासाठी भवानीपूरचे आमदार आणि कृषीमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिलाय. शोभनदेव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आपला विभानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शोभनदेव यांनी भाजप उमेदवार रुद्रनील घोष यांचा 50 हजाराच्या फरकाने पराभव केला होता.
ममता बॅनर्जी यांनी एकहाती झुंज देत पश्चिम बंगालमध्ये 213 जागांसह बहुमत प्राप्त केलं. पण नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव त्यांचेच जुने सहकारी आणि या निवडणुकीत भाजपवासी झालेल्या शुभेंदू अधिकारी यांनी केला. या निवडणुकीत ममता यांना अवघ्या 1 हजार 956 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर नंदीग्राममधील मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसंच आरोप-प्रत्यारोपही झाले.
2011 मध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली तेव्हाही ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हा त्यांनी भवानीपूरमधून पोटनिवडूक लढवली आणि विधानसभेवर गेल्या. 2011 च्या निवडणुकीत सुब्रत बख्शी यांचा विजय झाला होता. तेव्हा त्यांनी ममता यांच्यासाठी आपली जागा देऊ केली. तेव्हा ममता यांनी सीपीएमच्या उमेदवार नंदिनी मुखर्जी यांचा 95 हजाराच्या फरकारने पराभव केला होता. तेव्हा भाजप पश्चिम बंगालमध्ये 3 नंबरचा पक्ष ठरला होता.

Leave a Reply