संपादकीय संवाद – प्रत्येक डॉक्टरने माणूस व्हावे ही आजची खरी गरज

एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही तीन दिवस मृतदेहावरच उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा आणि पैश्यासाठी मृतदेह अडकवून ठेवण्याचा दुर्दैवी प्रकार नांदेडमध्ये घडल्याची बातमी आज समोर आली आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या पत्नीने न्यायालयात दाद मागितल्यावर आता न्यायालयाच्या आदेशाने संबंधीत रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्याकडे प्रेताच्या टाळुवरील लोणी खाणे अश्या आशयाची एक म्ह्नण आहे. तसाच हा प्रकार म्हणावा लागेल वस्तुतः डॉक्टरी पेशा हा लोकसेवेचा भाग म्हणून ओळखला जातो. डॉक्टरकडे आलेल्या रुग्णाचे प्राण वाचवणे आणि त्याला व्याधीमुक्त करणे हे डॉक्टरचे प्रथम कर्तव्य असते. या ठिकाणी पैसे कमावणे हा भाग दुय्यम असतो.
अर्थात असे सांगितले तर त्यावर डॉक्टर म्हणून व्यवसाय करणाऱ्यांचा प्रतिवाद असतोच या व्यावसायिकांच्या मते डॉक्टरांनाही पोट असते, घर, दार संसार सगळे असते त्याशिवाय त्यांना डॉक्टर होण्यासाठी अनेकदा महागडी फी भरून प्रवेश घ्यावा लागतो त्यासाठी अनेकदा कुटुंबियांना कर्जबाजारी व्हावे लागते. हे शिक्षण घेण्यासाठी त्यांची आयुष्यातील काही उमेदीचे वर्षही खर्ची पडतात. अश्यावेळी त्यांनी पैसे कमवायचे नाही काय? असा प्रश्न विचारला जातो. त्यापुढे जाऊन असाही युक्तिवाद केला जातो की डॉक्टरांना रुग्णालय उभारायचे तर जमीन किंवा इमारत सवलतीच्या दरात कधीच मिळत नाही. त्यासाठी बाजारभावानेच पैसे मोजावे लागतात. महागड्या यंत्रसामुग्रीसाठीही पैसा द्यावा लागतो. यासाठी बँकेचे कर्ज काढावे लागते तिथे बँक काही सवलत देत नाही. मग डॉक्टरांकडून त्यागाची अपेक्षा कितपत उचित आहे. असा प्रश्न समोरच्याला निरुत्तर करून जातो.
डॉक्टरांचीही बाजू बरोबर मानली तरी लुटालूट किती करावी यालाही काही मर्यादा आहेत. सध्या कोरोना काळात खासगी रुग्णालये प्रचंड लूट करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. कोणत्याही सेवेची मागणी वाढली की दरवाढ होतेच मात्र त्याला किती वाढू द्यावे यालाही काही मर्यादा असायला हव्यात नांदेडच्या प्रस्तुत प्रकरणात तर चक्क मृत्यू झाल्यावरही तीन दिवस मृतदेह ठेऊन त्यावर उपचार केल्याचे दाखवत पैसा उकळल्याचा आरोप होत असल्याचे कानावर आले. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणाराच म्हणावा लागेल.
कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाजवळ जाता येत नाही त्याचा अधिकच गैरफायदा घेतला जातो आहे. मात्र कोरोना नसतानाही असे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेकदा कानावर आल्या आहेत. मोठ्या रुग्णालयात गरज नसताना अनेकदा भाराभर चाचण्या करायला सांगितले जाते त्याचे वेगळे शुल्क आकारले जाते तेही बाहेरच्या तुलनेत भरमसाठ असते . बरेचदा रुग्णालय परिसरात असलेल्या औषधीच्या दुकानातून औषधे आणायला सांगितली जातात त्यांचा काहीही उपयोग नसतो नंतर ती वापस घेतली जात नाहीत. याशिवाय इतरही अनेक निरुपयोगी सेवांच्या नावावर वाटेल तास पैसा उकळला जातो .
डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे त्यालाही अन्न वस्त्र निवारा या गरजा आहेत. त्यासाठी त्याला पैसा गरजेचाच आहे मात्र हा पैसा कमावताना त्याने कसाई बनू नये इतकीच जनसामान्यांची माफक अपेक्षा आहे. मात्र काही सन्माननीय अपवाद वगळता आज अनेक डॉक्टर हे कसाई बनत चालल्याचे कानावर येत आहे याचा विचार व्हायला हवा. अशातूनच मग डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर हल्ले होण्याचे प्रकार घडतात नंतर डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायदा केला जावा म्हणून मागणी केली जाते. प्रसंगी डॉक्टर संपवरही जातात.
आज समाज निरामय राहण्यासाठी डॉक्टर ही गरज आहे. आणि डॉक्टरांसाठीही रुग्ण ही गरज आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजूंनी परस्पर समन्वय साधायला हवा मात्र त्यासाठी प्रत्येक डॉक्टरला आधी माणूस व्हावे लागेल हीच आजची खरी गरज आहे. जर प्रत्येक डॉक्टर हा माणूस झाला तर समाजही त्याला डोक्यावर घेऊन नाचेल हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply