विदर्भ एक्सप्रेसचे डबे सोडून इंजिन पुढे धावले

भंडारा : २० मे – भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरुन एक किमी अंतरावर गेलेल्या विदर्भ एक्सप्रेसला एकलारी या गावाजवळ झटका बसला. त्यानंतर दोन कोचमधील कल्पिंग तुटून पडले. ही बाब रेल्वे इंजिन चालकाला लक्षात येताच त्याने समयसुचकता दाखवत रेल्वे इंजिनचा वेग हळूहळू कमी करून रेल्वे थांबविली. तोपर्यंत इंजिन दोन जनरल बोगीचे डब्बे घेऊन जवळपास ३०० मीटर पुढे गेले होते. मात्र, रुळावरून डब्बे न घसरल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. एक तासाच्या प्रयत्नानंतर नवीन कप्लिंग लावल्यानंतर सर्व रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.
गोंदियावरून सुटणारी विदर्भ एक्सप्रेस ही भंडारा रेल्वे स्टेशनवर ४ वाजताच्या दरम्यान पोहोचल्यानंतर काही काळांनी ती पुढे गेली. स्टेशनवरून पुढे एक किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला. तेव्हा गाडीची गतीही कमी असल्याने एक्स्प्रेसचे डब्बे रुळांवरून घसरले नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हे डबे एका ठिकाणी थांबताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेची माहिती मिळताच, रेल्वे लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बोगीचे कप्लिंग तुटल्यामुळे दुसरे कपलिंग बोलावून तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर इंजिनपासून दूर गेलेले डब्बे पुन्हा जोडण्यात आले. या कालावधीत या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती.
यावेळी घटनास्थळी विदर्भ एक्सप्रेस गाडी चालक बी.के.वर्मा आणि गार्ड एस. बी. टेंबरे यांच्यासह भंडारा रोड स्टेशन मास्टर मेघाय मुरुमु, रेल्वे पोलीस निरीक्षक एस.के.दत्ता, उपनिरीक्षक दीपक कुमार, अरविंद टेंभुर्णीकर, ASI विभा औतकर, सहायक उपनिरीक्षक ओम प्रकाश शेंडे, आरक्षक देवेंद्र टेंभुर्णे यांच्यासह इतर कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून विदर्भ एक्सप्रेसला पुढच्या प्रवासासाठी व्यवस्थित केले.

Leave a Reply