नागपूर : २० मे – कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राला जबर फटका बसला आहे. मागील दीड वर्षापासून नाटक, सिनेमाच काय तर इतर कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम झालेले नाहीत. विदर्भाचा युवा अभिनेता प्रेम धिराल याचेही तीन चित्रपट लॉकडाऊनमध्ये असेच ‘लॉक’ झाले होते. आता हे तिन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या दहा ते पंधरा दिवसात एकामागोमाग रिलीज केले जाणार असून प्रेम धिराल चित्रपटांची ‘हॅटट्रिक’ साधणार आहे.
‘भा’ हा मराठी चित्रपट, ‘च्युत्यापा’ व ‘समकाल’ या दोन हिंदी चित्रपटांचे शुटींग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे काम लॉकडाऊनच्या आधी पूर्ण झाले होते. हे तिन्ही चित्रपट थिएटरमध्ये रिलिज करण्याची तयारीही झाली होती. परंतु, कोरोनाने भारतात शिरकाव केला आणि संपूर्ण देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. त्यात हे तिन्ही चित्रपट अडकले. लॉकडाऊनमुळे इंटरनेटवर आधारित ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप महत्व आले आणि त्यामाध्यमातून अनेक चित्रपट रिलीज करण्यात येऊ लागले. प्रेम व त्यांच्या टीमनेही ही संधी साधत ‘भा’, ‘च्युत्यापा’ व ‘समकाल’ हे तिन्ही चित्रपट ओटीटी प्लॅमटफार्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
या तिन्ही चित्रपटांमध्ये प्रेम धिराल प्रमुख भूमिकेत आहे. ‘भा’ या चित्रपटात प्रेमने एका गरीब शेतक-याच्या मुलाची भूमिका केली असून ‘समकाल’ या सायकोथ्रिलर चित्रपटात तो सायको पेशंटच्या भूमिकेत आहे. ‘च्युत्यापा’ हा विनोदी चित्रपट आहे. हे तिनही चित्रपट विविध चित्रपट महोत्सवांमध्येदेखील प्रदर्शित केले जाणार असल्याचे प्रेम धिरालने सांगितले.
……………
खूद ही करो, आगे बढो
प्रेम हा मूळचा चंद्रपूरचा असून मागील दहा वर्षांपासून तो नागपुरात वास्तव्यास आहे. हातमजुरी करणारे वडील किसन धिराल तो पाच वर्षाचा असतानाच जग सोडून गेले. आईने भाजी विकून पाच मुलांचा सांभाळ केला. आईला हातभार लागावा म्हणून प्रेम ने ‘खूद ही करो, आगे बढो’ ही खूणगाठ मनाशी बांधत वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा, स्टेज शो,रॉकबँडमध्ये गायला सुरूवात केली. त्याच्या नावावर 815 तास सलग गायनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे.
……………
गायक ते अभिनेता प्रवास
प्रेमचे वडील उत्तम बासरी वादक होते तर आई चांगली गाते. संगीताचे बाळकडू मिळालेल्या प्रेमने लहान वयातच गायला सुरूवात केली. पुढे टी स्टिरीज, शेमारू, अल्ट्रा बॉलिवुड या प्रतिष्ठीत संगीत कंपन्यांनी त्याचे अल्बमही रिलिज केले. ‘अल्ट्रा बॉलिवुडचे मालक जयश्वीरा यांनी माझा चेहेरा, बांधा बघून मला अभिनयाच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहित केले आणि सईद अख्तर या माझ्या मित्राने मला ‘भा’ चित्रपटात पहिल्यांदा संधी दिली’, असे प्रेम सांगतो.
………..
दिलीपकुमारचा चाहता
इमरान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी हे जरी प्रेमचे आवडते अभिनेते असले तरी तो दिलीपकुमारचा मोठा चाहता आहे. ‘लहानपणापासून दिलीपकुमार साहेबांचे खूप सिनेमे पाहिले आणि त्यातूनच अभिनयाचे बीज मनात पेरले गेले. त्यांच्या इतका प्रतिभावान अभिनेता दुसरा कोणी नाही. अॅक्टींग इतके सोपे काम नाही. त्यासाठी खूप मेहनत लागते, हे आता कळते आहे’, असे बत्तीस वर्षीय प्रेम सांगतो.