नागपूर : २० मे – सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना एकवेळचं जेवण मिळणंही अवघड झालं आहे. अशात नागपुरात मात्र तुम्हाला वेगळंच चित्र दिसले. इथे रस्त्यावरील भटकी कुत्री चिकन बिर्याणी खाताना दिसली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. नागपुरातील ज्योतिष रंजीत नाथ दररोज जवळपास १५० भटक्या श्वानांना स्वादिष्ट बिर्याणी खाऊ घालतात. त्यांना लोक रंजीत दादा या नावानं ओळखतात.
कोरोना महामारीचा प्रसार झाल्यापासून ५८ वर्षीय ज्योतिषी दररोज ३५ किलो बिर्याणी बनवतात. या कामात रंजीत यांनी मदत करणाऱ्या राहुल मोटवानी यांनी सांगितलं, की मागील अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत. मात्र, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून त्यांनी हे याचा विस्तार आणखी वाढवला. रंजीत यांना भटके श्वान आवडतात आणि त्यांना ते आपली मुलं असल्यासारखं मानतात.
रंजीत म्हणाले, की मला त्यांनी भटके किंवा कुत्रा म्हणणं अजिबात आवडत नाही. मी त्यांना स्वतःची मुलं समजतो. त्यांचा दिवसच बिर्याणीच्या तयारीनं सुरू होतो आणि सायंकाळ होताच ते आपल्या गाडीवर बिर्याणी घेऊन बाहेर पडतात अन् भटक्या प्राण्यांना बिर्याणी देतात.
रंजीत यांनी सांगितलं, की १०-१२ फिक्स जागा आहेत आणि माझ्या मुलांना त्या माहिती आहेत. मला पाहाताच ते सगळे माझ्या मागे धावू लागतात. रंजीत रिकामी डबा घेऊन अर्ध्या रात्री घरी पोहोचतात. त्यांनी सांगितलं, की मी कोणासोबतही भेदभाव करत नाही. मी मांजरांनादेखील बिर्याणी खाऊ घालतो. मात्र, बिर्याणीत चिकन असल्यानं ते गायांना खाऊ घालत नाही.
मागील महिन्यापर्यंत रंजीत हेच यासाठीचा बहुतेक खर्च करत असत. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रंजीत यांना त्या लोकांकडूनही आर्थिक मदत मिळत आहे, ज्यांच्याकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे ते भटक्या जनावरांना खायला देऊ शकत नाहीत. मोटवानी यांनी सांगितलं, की एका फूड ब्लॉगरनं रंजीत यांचा व्हिडिओ शूट करुन पोस्ट केला होता. यानंतर रंजीत यांना डोनेशन मिळू लागलं.