नवी दिल्ली : २० मे – भारतात आत्तापर्यंत असलेल्या करोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराची साथ सुरू झाल्याचं केंद्र सरकारने मान्य केलं आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगाणा आणि राजस्थानने याआधीच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराला महामारी घोषित केलं आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार देशभरातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना म्युकरमायकोसिसबाबत साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद असलेल्या नियमावलींचं पालन करणं आवश्यक ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता रुग्णांची तपासणी, उपचार आणि या आजाराच्या व्यवस्थापनासाठी साथरोग नियंत्रण कायद्यातील नियमावलीचा वापर करणं आवश्यक ठरणार आहे.