मृतकाच्या नातलगांना रुग्णालयात केली मारहाण

अकोला : २० मे – रेजन्सी हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू होता. परंतु उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना रुग्णालयाद्वारे देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत कारण विचारले असता, त्या नातेवाईकांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी कोविड केअर सेंटरमध्ये घडला आहे. यानंतर तिथे रामदास पेठ पोलीस दाखल झाले होते. नातेवाईकांनी यासंदर्भात रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शर्मा नावाचे रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह होते. आधी त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना टॉवर चौकातील रेजन्सी हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर दहा ते बारा दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सेन्टरच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळीच, तुमचा रुग्ण दगावल्याची माहिती त्यांना देण्यात आली. हा प्रकार नातेवाईकांना न कळल्याने, त्यांनी याबाबत सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून उत्तर न देता थेट मृत रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना घडली. दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण केली आहे. यामुळे तिथे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रामदास पेठ पोलीस कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी प्रकरण शांत केले. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली.

Leave a Reply