मुलानेच केला बापाचा खून, मृतदेह रेल्वे रुळावर टाकून केला आत्महत्याचा बनाव

चंद्रपूर : २० मे – राजुरा तालुक्यातील सिंधी गावातील तिरुपती तातोबा धानोरकर या शेतकऱ्याला त्यांच्या अठरा वर्षीय मुलाने ठार करून मृतदेह गावाजवळील जंगलातील रेल्वे रुळावर टाकून आत्महत्येचा बनाव केला. मात्र विरूर पोलिसांनी अवघ्या आठ तासात या घटनेचा छडा लावून आरोपी मुलगा निखिल धानोरकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृतदेह नेण्यास मदत करणाऱ्या त्याच्या एका मित्रालाही अटक करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी गावापासून अर्धा कि.मी. अंतरावरील जंगलात असलेल्या रेल्वे रुळावर गावातील तिरुपती धानोरकर या शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला. हा प्रकार आत्महत्या की घातपाताचा आहे, याची चर्चा गावात सुरू झाली. विरुर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करताना पोलिसांना मृत व्यक्तीच्या डोक्यावर व अन्य जागी मार असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद समजून पोलिसांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना माहिती देऊन तपास सुरू केला. प्राप्त माहितीनुसार शेती विकल्याने आलेल्या पैशातून धानोरकर पिता-पुत्रात मंगळवारी वाद झाला आणि मुलगा निखिल याने उभारीने वडिलांना मारहाण केली. यावेळी डोक्याला मार लागून ते जागीच मृत पावले. रेल्वे मृतदेहावरून गेल्याने त्याचे तुकडे झाले. मात्र मृतदेहावरील मारहाणीच्या खुणा व जखमा याच्यावरून ही आत्महत्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तातडीने पुढील तपास सुरू केला आणि अवघ्या आठ तासात आरोपी निखिल याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली.

Leave a Reply