नागपूर महापालिकेचा विम्स रुग्णालयाला दणका, रुग्णाचे पैसे परत करण्याचे आदेश

नागपूर : २० मे – नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी विम्स हॉस्पिटलला दणका दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना तीन लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने यासंदर्भात प्राथमिक चौकशी केल्यानंतर रुग्णाला २ लाख ६४ हजार ५४० रुपये दोन दिवसात परत करण्याचे आदेश हॉस्पिटलला दिले आहे. एवढेच नाही तर रुग्णालयाविरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील पत्र पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.
विम्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा
कोरोना रुग्णांवर उपचार करताना नागपूर शहरातील अनेक खासगी दवाखान्यात अक्षरशः लूट सुरू असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात माजी महापौर संदीप जोशी यांनी एक मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये ज्या रुग्णांना आपली कोरोनाच्या नावावर फसवणूक झाल्याचा संशय आहे, अशांनी बिलांचे ऑडिट करुन घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जयेश साखरकर यांनीदेखील बिलांचे ऑडिट करून घेतले. तेव्हा विम्स हॉस्पिटलने आपली अडीच ते तीन लाखांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी विम्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
काय आहे प्रकरण?
जयेश साखरकर यांच्या वडिलांना कोरोनामुळे विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करतेवेळी रुग्णालयाने साडेचारलाख रुपये भरण्यास सांगितले होते. दोन दिवस आयसीयूमध्ये आणि दोन दिवस ऑक्सिजन बेडवर उपचार केल्यानंतर रुग्णाची प्रकृती ठीक असल्यामुळे रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र सुट्टी घेताना रुग्णालयाने औषधांचे १ लाख १९ हजार २१८ रुपयांचे नव्याने बिल दिले. रुग्ण रुग्णालयात दाखल असताना पैसे देऊन औषध घेतल्यानंतरही इतके पैसे कसे झाले, या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सिंघानिया यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी ५० हजार रुपये भरून सेटलमेंट करण्याचा सल्ला दिला. यावेळी जयेश साखरकर यांनी रुग्णालयाला बिल मागितले तेव्हा रुग्णालय प्रशासनाने बिल देण्यास नकार दिला. यासंदर्भात जयेश साखरकर यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली आणि डॉक्टरांसोबत झालेल्या संवादाचे सगळे पुरावे दिले. त्यानंतर जोशी यांनी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची भेट घेत तक्रार दाखल केली होती, ज्यावर मनपा प्रशासनाने चौकशी करून रुग्णाला २ लाख ६४ हजार ५४० रुपये रुग्णालयाने परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply