डिसेंबर पर्यंत प्रत्येक नागरिकाला दिली जाणार कोरोनाची लस – जे. पी. नड्डा

नवी दिल्ली : २० मे – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी डिसेंबर पर्यंत प्रत्येक नागरिकाला करोनावरील लस उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सांगितले. यासोबत नड्डा यांनी काँग्रेसने लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचा आरोप केला आहे. भाजपाच्या खासदारांशी चर्चा करत नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
“पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना आणि मुख्यमंत्र्याना मार्च महिन्यातच करोना दुसरी लाट येण्याअगोदरच सर्व तयारी करण्यास सांगितले होते. भारताने फक्त ९ महिन्यातच दोन भारतीय लसी कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन तयार केल्या. आतापर्यंत १८ कोटी पेक्षा जास्त भारतीयांनी त्या घेतल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटी सर्व देशातल्या नागरिकांना लस देण्यात येईल यासाठी वेळ निश्चित केली जात आहे”, असे नड्डा यांनी सांगितले.
“केंद्रातील मोदी सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसीविरची उपलब्धता आणि पुरवठा सुनिश्चित केला आहे. सर्व राज्यांना आवश्यक मदत पाठविली जात आहे. ‘टूल किट’ने काँग्रेसचा खरा चेहरा समोर आणला आहे. करोनाच्या काळातही देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी अविरतपणे देशातील जनतेची सेवा करीत आहेत आणि काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवून भीती निर्माण करत आहे,” असे नड्डा म्हणाले.
भाजपातर्फे देशभरात गरजूंच्या मदतीसाठी सेवा ही संगठन-२ द्वारे काम करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते देशभरात क्वारंटाइन आहेत आणि भाजपा सेवा ही संघठनच्या माध्यमातून देशात आणि राज्यात चांगलं काम करत असल्याचे नड्डा म्हणाले.

Leave a Reply