कोरोना चाचणीसाठी निरीचा नवा पर्याय

नागपूर : २० मे – कोरोना चाचणी करण्यासाठी आरटीपीसीआर किंवा रॅपिड एन्टिजेन टेस्टचा वापर केला जातो. पण नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार तुमच्या थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही. महत्वाची बाब म्हणजे निरीच्या या संशोधनाला आयसीएमआर ने ही मान्यता दिली आहे. कोरोना चाचणीच्या या पद्धतीमुळे वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट येण्यास ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागत आहे. अशावेळी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना उपचार घेण्यास उशीर होत आहे. अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने जीवही गेलाय. यावर पर्याय म्हणून नागपूरच्या ‘निरी’ संस्थेने नवीन पर्याय शोधून काढलाय. सलाईनमध्ये वापरलं जाणारं ग्लुकोज तोंडात घेऊन त्याची गुळणी करून ती थुंकी एका बाटलीमध्ये घेतली जाते. त्या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्ट साठी केला जातो.
निरी संस्थेनं दिलेल्या या पर्यायामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. कारण ३ तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळू शकणार आहे. तसंच नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्यासाठी लागणाऱ्या किटचीही गरज भासणार नाही. आयसीएमआर ने या पद्धतीला मान्यता दिलीय. सुरुवातीला देशभरातील पाचशे लॅबमध्ये या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमध्ये चाचणीसाठी लोकांना रांगेत लागण्याची गरज नाही. शिवाय वेळही वाचेल आणि संसर्ग होण्याचाही धोका कमी होईल. त्यामुळं लवकरात लवकर ही पद्धत अंमलात आणल्यास चाचण्या सुलभ आणि सुकर होण्यास मदत होईल, असं या संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply