आदिवासींच्या रोजगारासाठी झटणारे डॉ. सुनील देशपांडे यांचे कोरोनाने निधन

अमरावती : २० मे – मेळघाट सारख्या दुर्गम भागात बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरातील आदिवासी बांधवांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ. सुनील देशपांडे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
मेळघाट भागातील लवादा गावात अशिक्षित, निर्धन पण होतकरू आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सुनील देशपांडे मेळघाटातच स्थायिक झाले. संपूर्ण बांबू केंद्र, सिपना शोध यात्रा, ग्राम ज्ञान विद्यापीठ ह्या उपक्रमातून समरस झाले. काही समाज कंटकांनी त्यांच्यावर हल्ले केले.त्यांचं घर पेटवून देण्याइतके टोकाचे कारस्थान केले पण आदिवासी बांधवांच्या प्रेमापोटी ते तेथे टिकून राहिले. आड्या पटेल ह्या आदिवासी जीवनातील व्यक्ती व्यवस्थेचा त्यांनी खूप मोठा अभ्यास करून या व्यक्तीरेखेलाला नेतृत्वाचे धडे दिले. आदिवासीना उपयोगी अशी त्यांची संस्कृती टिकवत जे कालबाह्य ते सोडावे या साठी त्यांनी मैत्री वाढविली व परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला.
सर्वच बाबींचा जर ब्रँड होऊ शकतो व ब्रँड उपक्रम होऊ शकतो तर बांबू त्याला अपवाद का? असं म्हणून सुरुवात केलेल्या बांबू राखीची दखल खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली. मेळघाटातील बांबू राखीचा ब्रँड करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. सामान्य आदिवासी माणसे मोठी करण्याला मोठे धैर्य, मोठे मन व मोठी सहनशक्ती पाहिजे आणि याही उपर निस्वार्थ, निर्व्याज, आतून फुटलेले प्रेम पाहिजे ते सुनील देशपांडे यांच्याकडे होते, सुनील देशपांडे यांच्या अकाली जाण्याने मेळघाटातील नवनिर्मितीचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply