तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेसी नेते राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले. ज्यावेळी निधन झाले त्यावेळी त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव मराठवाड्यातील त्यांच्या गावी नेण्यात आले. त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने त्यांचे अंत्यदर्शन घेतले मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
या सर्व बातम्या सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या त्यानंतर समाजमाध्यमांवर याबाबत आक्षेप घेणें सुरु झाले. सध्या कोरोनाची दुसरी लाट प्रचंड प्रमाणात दिसते आहे. यावेळी अंत्यविधीसाठी २५ च्या वर नागरिक उपस्थित राहू नये असे शासकीय आदेश आहेत. ज्याठिकाणी हे आदेश पळाले जात नाहीत त्या ठिकाणी कोणतीही दयामाया न दाखवता कडक कारवाई केली जाते. हे रास्तही आहे कारण कोरोना संपर्काने वाढतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच संपर्क टाळायलाच हवा म्हणूनच लग्न असो की अंत्ययात्रा २५ च्या वर गर्दी होऊ नये ही मर्यादा शासनाने घालून दिलेली आहे.
अश्या परिस्थितीत राजकीय नेत्याच्या अंत्ययात्रेला आणि अंत्यदर्शनाला हजारो लोक जमतात आणि मान्यवरही उपस्थित राहतात. त्यावेळी प्रशासन काहीही आक्षेप घेत नाही हा प्रकार न समजणारच म्हणावा लागेल. राजीवजींच्या अंत्ययात्रेला आलेल्या हजारो नागरिकांमधून काहींना कोरोनाची लागण झालीच नसेल कशावरून? अश्या वेळी अशी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकते हा धोका का लक्षात घेतला गेला नाही? स्वर्गीय राजीव सातव हे लोकप्रिय नेते होते हे मान्य केले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचा चाहत्यांना प्रशासनाने का आवरले नाही याचे उत्तर प्रशासनाला मागायला हवे. माणूस कितीही मोठा असला तरी कोरोना समोर तो पालापाचोळाच ठरतो हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.
इथे स्वर्गीय ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेची आठवण होते. गतवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. ऋषी कपूर हे एक लोकप्रिय अभिनेते होते त्यांचे निधन झाले त्यावेळी कोरोनाची पहिली लाट अगदी जोरात होती. देशभरात कडक लॉक डाऊन सुरु होता एरवी ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आले असते मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेला फारसे कोणी आले नाहीत किंवा पोलिसांनी कुणाला येऊ तरी दिले नसेल. ज्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पार्थिव नेणारी शववाहिका मुंबईतील स्मशानभूमीत पोहोचली त्यावेळी अगदी मोजकेच लोक तिथे असल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखवले. म्हणजेच कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी गर्दी टाळण्याचा शहाणपणा ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी तरी दाखवला असेल किंवा प्रशासनाने हा शहाणपणा दाखवण्यासाठी चाहत्यांना बाध्य तरी केले असेल. हे नक्की .
अश्या स्थितीत जो शहाणपणा ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी दाखवला गेला तो शहाणपणा राजीव सातव यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी का दाखवला गेला नाही? हा प्रश्न जनसामान्य निश्चित विचारू शकतात. ऋषी कपूर यांचा मृत्यू कोरोनाने झाला नव्हता त्यामुळे धोका कमी होता राजीव सातव यांचा मृत्यू मात्र कोरोनानेच झाला होता त्यामुळे धोका जास्त होता. तरीही प्रशासनाने ढिलाई दाखवावी हे अनाकलनीय आहे. इथे काही राजकीय दबाव होता का? याचाही खुलासा व्हायला हवा आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जायला हवी.
अविनाश पाठक