मुंबई : १९ मे – पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. टूलकिट तसंच राहुल गांधींकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी हा आरोप केला. दरम्यान देशात अगदी उद्या निवडणूक झाली, तरी मोदी सरकार ४०० जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळे भाजपाला ४०० काय अगदी ५०० जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील संसदेच्या सर्व जागा जिंकू शकतात. सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा करोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचे आहे”.
संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात पाहणी दौऱ्यावरुनही टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ आहेत, याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल आणि ज्याठिकाणी जास्त नुकसान झालं, पण कमजोर सरकार आहे. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतील, त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत,” असा चिमटा राऊत यांनी मोदींना काढला.