खतांच्या किमती कमी करण्यासाठी भाजपच्या खा. प्रीतम मुंडे यांनीही लिहिले पत्र

बीड : १९ मे – अगोदरच लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आली आहे. रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे.
खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये केलेल्या अत्याधिक दरवाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे, असं खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लॉकडाउनमुळे शेतमाल विक्री करताना आल्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला यावर्षी खताचे भाव वाढल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आली आहे. यातच केंद्र सरकारने कमी करावेत, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात असताना प्रीतम मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची परिस्थिती कळवत रासायनिक आणि मिश्र खतांचे भाव कमी करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
यावर्षी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याने पेरणी कशी करावी, हे त्याच्या समोरच एक खूप मोठे संकट आहे. यातच खताचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Leave a Reply