इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यू

बुलडाणा : १९ मे – मान्सुन पुर्व झाडाची कटाई करण्यासाठी इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या एका सव्वीस वर्षीय वायरमनचा वीज प्रवाहीत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना १८ मे रोजी दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास चिखली रोड वरील वन विभागाच्या गेटजवळ घडली. या घटनेमुळे वीज कर्मचार्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील सोळंके ले आऊट येथील रहिवासी तथा वीज कंपनीचे कर्मचारी योगेश शामराव काळे (वय 26) हे दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास वन विभागाच्या गेटजवळ मान्सूनपूर्व झाडाची कटाई करण्यासाठी वीज खांबावर चढले. परंतु काम करीत असतानाच अचानक त्यांना वीज प्रवाहीत तारेचा शॉक लागला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करून वीज कर्मचार्यास खांबावरून खाली काढण्यात आले. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी तत्काळ येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचार्यांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान साडेसहा वाजेच्या सुमारास त्या कर्मचार्याला डॉ. अमित धांडे यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पीएस आय सुधाकर गवारगुरू व कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील कारवाई शहर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply