नागपूर : १९ मे – नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वेगवान अनियंत्रित इनोव्हा कारने ई-ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ऑटो चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बैद्यनाथ चौकातील ग्रेट नाग रस्त्यावर घडली. या अपघातातील मृत आणि इनोव्हा चालकांच्या संदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कारची गती जास्त होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ई-रिक्षाला इनोव्हा गाडीने जोरदार धडक दिली. यात ई-रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. त्यानंतर इनोव्हा गाडी अनियंत्रित होऊन दुभाजकावर उलटी झाली. या अपघातात इनोव्हा चालकाला देखील दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने इनोव्हा चालकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.
अपघातामुळे बैद्यनाथ चौकातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.