आता उद्धव ठाकरेही कोकणच्या दौऱ्यावर जाणार

मुंबई : १९ मे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोकणात वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. ठिकठिकाणी विजेच्या ताराही पडल्या आहेत. या वादळाचा सर्वात मोठा फटका महावितरणला बसला आहे. महावितरणचे कर्मचारी कोकणातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मात्र, नुकसान मोठं झाल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू होण्यास पाच ते सहा दिवस लागतील, असं सामंत म्हणाले.
दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा उद्या 20 मे रोजी कोकण दौऱ्यावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. 20 ते 23 मेपर्यंत ते कोकणातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. या तीन दिवसाच्या दौऱ्यात ते कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नुकसानीचा आढावाही घेणार आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) रायगड, उद्या रत्नागिरी, तर परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असणार आहेत.

Leave a Reply