मुंबई : १९ मे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी त्यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतात. आताही त्यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस यांच्यातील ट्वीटर वॉर चांगलाच रंगला आहे. रुपाली चाकणकर यांनी ‘जंगल की शेरनी शिकार करती है… सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !’. असं ट्वीट केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी तौक्ते चक्रीवादळावरून एक ट्वीट केलं होतं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलं. यावर पुन्हा अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटला उत्तर दिलं. तर यावरही रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या शैलीत ट्वीटला उत्तर दिलं आहे.
खरंतर, अमृता फडणवीस यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है !’ असं ट्वीट केलं होतं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी ‘तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है, महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!’ असं ट्वीट करत त्यांना प्रत्यूत्तर दिलं. यावर अमृता फडणवीसांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत ट्वीट केलं.
रुपाली चाकणकर यांच्या ट्वीटला उत्तर देताना अमृता फडणवीसांनी ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !’ असं ट्वीट केलं. यामुळे राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. पण अखेर यावर रुपाली चाकणकर यांनी पुन्हा चोख शब्दात ट्वीट करत अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, ‘जंगल की शेरनी शिकार करती है… सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !’. रुपाली चाकणकर यांच्या या ट्वीटमुळे आता अमृता फडणवीस आणखी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर एकीकडे राज्यावर चहुबाजूने संकट असताना राजकीय नेते, प्रतिनिधी मात्र आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याने नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.