नागपूर : १८ मे – चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडीत न ठेवता तपासात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस शिपाई व उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
भारत रमेश थिटे (३०) असे पोलीस उपनिरीक्षक आणि अमित शंकर पवार (२८) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. लाचखोर शिपाई व उपनिरीक्षक कुही पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणातील तक्रारदार हा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. थिटे त्याच्या प्रकरणाचा तपास करीत होते. त्याची पोलिस कोठडी न घेता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत व्हावी यासाठी व पुढील तपासातसुद्धा त्याला मदत करण्याच्या मोबदल्यात थिटेने या तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली. या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पुढे त्याची जामिनावर मुक्तता झाली. त्याने या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली. विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात आणि त्यांच्या चमूने सापळा रचला. यात पवार हा तक्रादाराकडून थिटे यांच्यासाठी पैसे घेताना रंगेहात सापडला. एसीबीने दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.