अकोला : १८ मे – बार्शिटाकळी येथील वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणार्या पिंपळखुटा-गोरवा मार्गावरील शेताच्या बाजूला असलेल्या एका तलावानजीक सहा मोर व सात लांडोरींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.या मोर व लोडोरींचा मृत्यू नेमका कशाने झाला याची चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे उपवनसंरक्षक के.आर.अर्जुन, साहाय्यक उपवनसंरक्षक सुरेश वडोदे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळने, वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे, बार्शिटाकळीचे तालुका पशुधन अधिकारी डॉ. रंजित गोळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. वर्षा चोपडे, प्रभारी वनपाल पी.डी. पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. या मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांमध्ये सात लांडोर, सहा मोर यांच्यासह तीन टिटव्या, दोन चिमण्यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय पक्ष्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी मृत्यू होणे ही गंभीर घटना असून, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांची शिकार झाली असल्यास वन विभागामार्फत कडक पावले उचलली जातील असे अकोल्याचे उपवनसंरक्षक, के.आर.अर्जुन यांनी सांगितले आहे.