शेतातच सापडली अवैध स्फोटके, १ आरोपी अटकेत

अमरावती : १८ मे : तिवसा तालुक्यातील घोटा येथे मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर आढळले असून पोलिसांनी याबाबत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईची माहिती पोलिसांकडून सोमवारी देण्यात आली.
सध्या मुंबई येथे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीमध्ये स्फोटक पदार्थ सापडल्याने गंपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली असतांना अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन यांनी दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकास अवैधरित्या स्फोटके बाळगणार्या लोकांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय गराड, कर्मचारी गानल कंवतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभणे, श्यामकुमार गायंडे, चंद्रशेखर खंडारे, मंगेश लकडे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तिवसा तालुक्यातील घोटा येथे धाड टाकून अबंधरीत्या स्फोटक पदार्थ बाळगणार्या इसमांवर धडक कारवाई केली.
पोलिसांनी घोटा येथील युवराज उध्दव नाखले याला ताब्यात घेऊन त्याच्या शेतामधील गोदामावर धाड टाकली असता तेथे तब्बल 1300 नग जिलेटीनच्या कांड्या, 835 डिटोनेटर, एक ब्लास्टींग मशीन बसविलेला ट्रॅक्टर आढळून आले. याबाबतचा कोणताही परवाना युवराजकडे नव्हता. त्याने ही स्फोटके मार्डी येथील ईश्वर मोहोड याने पुरविल्याचे सांगितले. मुद्देमालासह युवराजला पुढील कारवाईसाठी कुर्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a Reply