नागपूर : १८ मे – राज्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ११ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती असून यात काही जण बेपत्ता झाले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. तर १२ हजार घरांचे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत १५ हजार लोकांना सुरक्षित जागेवर हलविले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादळाच्या नुकसान भरपाईसाठी निकषाबाहेर जाऊन आघाडी सरकार मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
वादळामुळे झालेले नुकसान मोठे असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत दुपारी एक वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीतून माहिती घेणार आहे. याबाबत तातडीने सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश दिली आहे. रात्रीपर्यंत १३० गावांशी संपर्क तुटला होता. आज १० ते १२ गावाचा संपर्क होत आहे. वादळ आणि विद्यूत पुरवठा खंडित झाल्याने संपर्क करण्यास अडचणी येत होत्या.
कोणाला नेहमीच वादळाचा फटका बसतो त्यात सर्वाधिक नुकसान हे वीज वितरणचे होत आहे. कोकण किनारपट्टी वर ३०० गावं अशी आहेत, जिथे नेहमीच वादळाचा फटका बसतो. यामुळे या चार जिल्ह्यात तिथे वीज यंत्रणा अंडरग्राउंड करण्याचे विचराधीन आहे. याबद्दल चर्चासुद्धा मुख्यमंत्री यांच्याशी झाली आहे.
येत्या दोन दिवसात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन लवकरात लवकर मदत कसे पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोकणात झालेल्या नुकसानसाठी महाविकास आघाडीचे स्पष्ट भूमिका आहे, मागील वेळेप्रमाणे सुद्धा निकष बदलून मदत केली होती. यावेळीही निकषांचा बाहेर जाऊन मदत करण्याचा मानस आहे.
जरी आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी मदत केली जाईल. कारण एकदा फळबाग नष्ट झाली की पुढील सात आठ वर्षे उत्पन्नवर त्याचा परिणाम होतो. असेही वडेट्टीवार म्हणाले. मागच्या वादळाच्या वेळी ही महाविकास आघाडी सरकारने निकष बदलून मदत केली होती. गेल्या वेळेला ५० हजार हेक्टरी मदत दिली होती. यावेळेसही मदत केली जाणार आहे.
गेल्या वेळच्या वादळात मदत पोहोचली नसल्याची तक्रार होती. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणालेत की पंचनामे करायला वेळ लागतो. मागील वेळी ते पंचनामे झाल्यानंतर सर्वाना मदत पोहोचली होती. यंदा पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे, आजपासून पंचनामे सुरू होतील. ज्यांचे घरांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची आणि धान्य, खाण्या-पिण्याचे साहित्य लवकरच देण्यात येईल. यासाठी मदतीचे निर्देश दिले आहे.
एसडीआरएफ आणि एनडीआरच्या निकाषानुसार केंद्राने मदत करावी. यापूर्वी प्रचंड नुकसान झाले असून याची पाहणी करताना केंद्राने पथक पाठवून त्याचा आढावा घेतला पाहिजे. अशी विनंती केंद्र सरकारला आज पत्राद्वारे करणार आहोत. तसेच लवकरात लवकर पथकाने पाहणी करून मदत मिळावी. अशी विनंतीही केंद्र सरकारला करणार आहोत. असेही वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.