लघुप्रकल्पात बुडून मामासह २ भाच्यांचा मृत्यू

बुलढाणा : १८ मे – जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा बुडून करूण अंत झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. १७ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान पुणे येथे नोकरी करणारा विनायक गाडगे (वय २७) सध्या टाळेबंदीमुळे धानोरा येथे घरी आला होता. त्याला सोबती त्यांच्या काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय १८) व लग्न समारंभाकरिता दाताळा ता. मलकापूरवरून आपल्या बहिणीला घ्यायला आलेले त्यांचे मामा नामदेव वानखडे (वय ४३) हे तिघे धानोरा लघु प्रकल्प परिसरात काल (१७ मे) फिरायला गेले.
परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. या घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील यांनी पोलिसांना दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन काठावर आढळून आले. तोपर्यंत रात्र झाल्यानें अंधारात शोध घेता आला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये त्या तिघांचेही मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply