ब्लॅक फंगससाठी लागणाऱ्या औषधांबाबत नेमकी परिस्थिती न्यायालयात सादर करा – उच्च न्यायालय

नागपूर : १८ मे – कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना आता ‘म्यूकरमायकोसिस’अर्थात ब्लॅक फंगस या गंभीर आजाराचा विळखा बसत आहे. या आजारांवर आवश्यक असलेले एम्फोटेरिसीन बी. हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे या औषधीच्या उपलब्धतेबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती अविनाश घरोटे व न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी १९ मेपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.
एम्फोटेरिसीन बी. हे औषध बाजारात उपलब्ध करून देण्यात यावे, याकरिता श्वेता बुरबुरे, मीतिशा कोटेचा, रूखशार शेख यांनी अँड. अनिलकुमार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. म्यूकरमायकोसिस हा गंभीर आजार होत असल्याचे आढळून येत आहे. या आजारावर उपचार करण्याकरिता सध्या एम्फोटेरिसीन बी. या औषधीचा वापर करण्यात येत आहे. परंतु या औषधीची सध्या टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हे औषध उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे औषध या आजारांवर देण्याबाबत प्रभावी उपचार आहे की नाही, याबद्दल माहिती नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले असून यासंदर्भात राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. मध्यस्थींनी उच्च न्यायालयाला याबाबत माहिती करून द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सीएसआर निधी दिलेल्या कंपन्यांची यादी पुढील सुनावणीपर्यंत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने सादर करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply