कोलकाता : १८ मे – पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री सोवन चॅटर्जी यांच्यानंतर मंगळवारी सकाळी सुव्रत मुखर्जी यांचीही प्रकृती बिघडलीय. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
रात्री उशिरा मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांची तब्येत बिघडल्यानंतर दोन्ही नेत्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगातून एसएसकेएम रुग्णालयाच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये हलवण्यात आलं होतं.
सीबीआयनं २०१४ मध्ये नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना आढळलेल्या चार आरोपींवर अटकेची कारवाई केली. सीबीआयनं नारदा घोटाळ्यात सोमवार तृणमूल काँग्रेस दोन मंत्र्यांसहीत एकूण चार नेत्यांना अटक केली होती. यामध्ये फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी तृणमूल नेते तसंच कोलकाताचे माजी महापौर सोवन चॅटर्जी यांना अटक करण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या नेत्यांपैंकी केवळ फिरहाद हकीम तुरुंगात आहेत.
सोमवारी, मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सीबीआय कार्यालयात दाखल होत सीबीआय अधिकाऱ्यांना आपल्याला अटक करण्याचं आव्हान दिलं. तृणमूलच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या अटकेचा निषेध म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सहा तास सीबीआय कार्यालयात धरणं दिलं. त्यांनी सीबीआय परिसरात गर्दी केली होती. कोलकाताच्या निजाम पॅलेसमधील सीबीआय कार्यालय राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं.
सीबीआयच्या विशेष कोर्टानं तृणमूल नेते फिरहद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चॅटर्जी यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. परंतु कोलकाता उच्च न्यायालयानं काही वेळेतच खालच्या न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.
तसंच या अटकेविरोधात हुगळी, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांसहीत इतर भागात तृणमूल समर्थकांनी टायर जाळले, रस्ते अडवले. राज्यात झालेल्या निदर्शनांची दखल घेत राज्यपाल जगदीप धनकर यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा आवाहन केलं.