खतांच्या किमती वाढवल्याबद्दल शरद पवारांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवले

मुंबई : १८ मे – राज्यातल्या खतांच्या वाढत्या किमतीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचाही उल्लेख केला आहे.
केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे करोनाच्या संकटाने शेतकरी आधीच होरपळून निघालेला असताना खतांचे दर वाढवणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे, असंही पवार म्हणाले. पवार यांनी या पत्राविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.
या पत्रात त्यांनी गौडा यांना देशातली परिस्थिती आणि त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकलेली संकटं यांच्याविषयी माहिती दिली आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे जनता संकटात सापडली आहे. लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशावेळी त्यांना मदत करायची सोडून खतांच्या किमतीत वाढ करुन सरकार त्यांच्या संकटात भर घालत आहे असंही पवार या पत्रात म्हणाले.
खतांच्या किमती वाढवण्याचा हा निर्णय धक्कादायक असून त्याचा पुनर्विचार करुन तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर करोनाच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने करावा असंही या पत्रात लिहिलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी या दरवाढीचा निषेध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी राज्यभरात आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply