उत्तर प्रदेशात भाजप आमदाराने व्यक्त केली नाराजी

लखनौ : १८ मे – उत्तर प्रदेशातील सीतापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार राकेश राठोड यांनी योगी सरकारवच टीका केली आहे. राज्यात करोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या परिस्थितीबद्दल कुठे बोलल्यास “देशद्रोहा”चा गुन्हा दाखल होऊ शकतो असे ठाकूर यांनी सांगितले.
सीतापूरचे आमदार राकेश ठाकूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सरकार आपल्या आमदारांचे देखील ऐकत नसल्याचे सांगितले. आमदारांची लायकी काय आहे? आम्ही जास्त बोललो तर देशद्रोहाचा गुन्हा आमच्यावरही दाखल होईल असे ते या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
“सगळं काही चांगलं चाललं आहे. आम्ही तर हेच म्हणणार की यापेक्षा चांगल काहीच होऊ शकत नाही. आम्ही हे नक्की सांगू शकतो की, जे सरकार म्हणतं तेच योग्य आहे. आमदारांची लायकी काय आहे? आम्ही जास्त बोललो तर आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आमच्यावरही दाखल होईल. तुम्हाला वाटतं का आमदार आपले म्हणणे सरकारसमोर मांडू शकतात ?” असे ठाकूर म्हणाले.
राकेश ठाकूर १४ मे रोजी पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी त्यांना वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे सीतापूर येथे ट्रॉमा सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यानंतर पत्रकारांनी लॉकडाउनच्या संदर्भात विचारले असता सगळं काही चांगलं चाललं आहे यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही असं सांगितलं.
सीतापूर येथील ट्रॉमा सेंटर हे २०१६ साली तयार करण्यात आलं होतं. मात्र अद्याप ते सुरू करण्यात आलं नव्हतं. ट्रॉमा सेंटर सुरू झाले असते तर रुग्णांना आयसीयूची सुविधा तिथेच मिळाली असती असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राठोड यांनी तुम्हाला वाटतं का आमदार आपलं म्हणणं सरकारकडे मांडू शकत असतील? असे सांगितले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, “आपण जे बोललो त्याच्यावर ठाम आहोत पण पुढे बोलू इच्छित नाही. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि मी आता अधिक न बोलणे हेच चांगले आहे” अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.
दरम्यान, याआधी देखील राठोड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी लाईट बंद करून थाळ्या वाजवण्याच्या केलेल्या आवाहनावर टीका केली होती. आणखी एका कॉलमध्ये राज्यात राम राज्य आल्याचे उपहासात्मक पद्धतीने त्यांनी म्हटले होते.

Leave a Reply