मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीने उर्वरित महाराष्ट्र निराधार – प्रकाश आंबेडकरांची टीका

अकोला : १७ मे – कोरोना संकटात राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंबई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात लक्ष देतात. पण, त्याच्या या कृतीने उर्वरीत महाराष्ट्र निराधार झाल्याची गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अकोल्यात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता असताना राज्य सरकार गाफील आणि झोपलेले असल्याचे म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना बाधित करणार असल्याचा इशारा केंद्र शासनाने दिला आहे. असे असताना राज्य शासन स्तरावर या विषयी कुठलिही जनजागृती, उपाययोजना, संभाव्य औषधीसाठा निर्माण करणे,वितरण साखळी स्थापन होताना दिसत नसल्याची खंत अँड.आंबेडकर यांनी व्यक्त केली. राज्याच्या या निष्काळजीपणाने लहान मुलांबाबत अधिक भावनिक असलेले पालक आक्रमक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. लहान मुलांच्या पालकांचा रोष हा सर्वप्रथम डॉक्टर व परिचारिकांवर निघेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. बालकांचा मृत्युदर वाढल्यास कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल हे केवळ लहान मुलांसाठी राखीव ठेवत तिथे अत्याधुनिक सुविधा लहान मुलांसाठी व पालकांसाठी वापरण्याची गरज त्यांनी वर्तवली. मुख्यमंत्र्यांशी संवाद होत नसल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांची व तज्ञांची घोषणा करा आम्ही त्यांच्याशी बोलून मार्ग काढू. असा पुढाकार घेण्यास आंबेडकरांनी स्वतः तयारी दर्शवली. राज्यात कोविड रुग्णालयांसाठी विशेष परवानगीची गरज नसावी. सर्व रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगीची घोषणा शासनाने करावी. जे डॉक्टर उपचार करणार नाही त्यांची नोंदणी रद्द करावी. त्याच बरोबर रुग्ण वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेशिवाय खाजगी गाड्यांना परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे ते म्हणाले.
राज्य शासन गाफील राहीले आणि असाच मृत्यूदर वाढत राहिला तर मनुष्यवधाचा गुन्हा शासनावर पण दाखल करावा लागेल असे ही संकेत त्यांनी दिले. विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे कोविड सेंटर काढून तिथले व्यवस्थापन करावे, असा सल्ला आंबेडकर दिला. तर अकोल्यातील जनता बाजार दूसरीकडे हलविता येणार नाही असे ही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. अकोला जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील भविष्यात कोरोना रुग्णांवर उपचार करेल तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी दक्ष असेल असा दावा अँड.आंबेडकर यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर सुलताने, प्रमोद देंडवे, प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, राम गव्हाणकर, अरुंधती शिरसाट, राजेंद्र पातोडे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ.प्रसन्नजीत गवई व पराग गवई आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply