बीडच्या विजयसिंह बांगर यांच्या माणुसकीचे होते आहे कौतुक

बीड : १७ मे – गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने घेरलं आहे. अनेकांचे घरातले, परिचयाचे लोक कोरोनाने हिरावून घेतले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तिच्या घरी जाणे काय त्याची सावलीही अंगावर पडू नये म्हणून लोक खबरदारी घेत आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातही अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे.
पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावातील एक संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झालं आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्याच कुटुंबातील घरी असलेल्या एका ९० वर्षीय आजीही गंभीर आजारी पडल्या. परंतु घरी कोणीच नसल्याने त्यांनी कोणी दवाखान्यात उपचारासाठी नेऊ शकले नाही. तसेच वयोमानामुळे त्याही चालू शकत नसल्याने त्याही दवाखान्यात जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासू गंभीर अवस्थेत त्या जनावराच्या गोठयासमोर पडून होत्या. तर या कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली असल्याने आजीलाही कोरोनाची लागण झाली असावी या भीतीने शेजारीपाजारी आणि गावातील कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. त्यामुळे ती अंथरुणावर अक्षरश: पडून होती.
याबाबत माहिती कळताच विजयसिंह बांगर या सामाजिक कार्यकर्त्याने आजीला हाताने उचलून स्वत:च्या गाडीतून बीड जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये भरती केलं. काही मित्रांच्या मदतीने त्याने या आजीला चादरीत गुंडाळून थेट रुग्णालयात नेले. कोरोनाची पर्वा न करता या तरुणाने आजीला हात दिला. वेळीच उपचार मिळाल्याने आजीची तब्येत आता ठणठणीत आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा मदतीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. त्याला प्रचंड लाईक्स मिळत असून बांगर यांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक होत आहे. बांगर यांच्या माणुसकीचं कौतुक होत असलं तरी एका वयोवृद्ध आजीला कोणीही मदत केली नाही त्यांच्या माणुसकीचं काय? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. कोरोनाने माणुसकी गोठवली काय? असाही सवाल केला जात आहे.

Leave a Reply