बाप-लेकांचा तलावात बुडून मृत्यू , सुदैवाने पत्नी थोडक्यात बचावली

नागपूर : १७ मे – वाढदिवस साजरा करण्यासाठी तलावावर गेलेल्या बापलेकाचा तलावातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहगाव झिल्पी येथे घडली. सुदैवाने वेळीच लोक धाऊन आल्याने पत्नी थोडक्यात बचावली. अब्दुल आसिफ अब्दुल गनी (35) आणि अब्दुल शहबिल अब्दुल आशिक (12) रा. टिपू सुल्तान चौक, संघर्षनगर अशी मृत बापलेकाची नावे आहेत.
अब्दुल आसिफ यांच्या सहा वर्षीय मुलाचा सोमवारी वाढदिवस होता. शहरात टाळेबंदी असल्याने सर्वकाही बंद आहेत. त्यामुळे वाढदिवस साजरा करायला कुठे जायचे असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावर पत्नी आसना हिने आपण तलावाच्या ठिकाणी जाऊ म्हटले. त्यावर आसिफ विचार केला. नागपुरात तर कुठेच तलाव नाहीत मग जायचे कुठे? असा प्रश्न त्यांना पडला. त्यावर त्याने आपण गावाच्या बाहेर मोहगाव झिल्पीला जाऊ असे त्यांनी आसनाला सांगितले. आफिस, आसना, मोठा मुलगा शहबिल आणि लहान मुलगा यांनी तयारी केली आणि सकाळी ११.३० च्या सुमारास ते दुचाकीनेे मोहगाव झिल्पीच्या तलावावर आले. सोबत खायला काही खाद्यपदार्थ देखील आणले होते.
काही वेळ त्यांनी तलावाच्या काठावर घालविला. तलावातील पाणी पाहून शहबिलला पाण्यात जाण्याचा मोह झाला. त्याने आपल्या अब्बूकडे पाण्याची जाण्याची परवानगी मागितली. दोघेही बापलेक पाण्यात उतरले. आसना आणि लहान मुलगा हे काठावरच होते. दोघाही बापलेकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. पती आणि मुलाला पाण्यात बुडताना पाहून आसना त्यांच्या मदतीला धावली. तोच काठावरील लोकांनी तिला पकडले. तोपर्यंत दोघेही बापलेक पाण्यात बुडाले होते.
बापलेकाला पाण्यात बुडाल्याचे पाहून आसनाचे एकच आकांत केला. त्यामुळे आजूबाजूला असलेले लोक घटनास्थळी जमा झाले. कुणीतरी ही माहिती हिंगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोहणार्यांच्या मदतीने पोलिसांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply