पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे हाय व्होल्टेज ड्रामा

कोलकाता : १७ मे – पश्चिम बंगालच्या एका मंत्र्यासह टीएमसीच्या चार नेत्यांना सीबीआयने अटक केल्याने पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. मंत्री आणि नेत्यांना अटक केल्याने संतप्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालयात जाऊन सीबीआय अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. तर टीएमसी कार्यकर्त्यांनी राजभवनाला घेराव घातला आहे. या हाय व्होल्टेड ड्राम्यामुळे बंगालमधील राजकारण चांगलंच तापलं आहे.
आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. तसेच भाजपचे एकेकाळचे नेते सोवन चॅटर्जी यांच्या घरीही छापेमारी केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सोवन चॅटर्जी यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मंत्री, आमदारांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआयलाच आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. टीएमसीचे नेते आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आले आहे. त्यामुळे मलाही अटक करा, असं त्या म्हणाल्या आहेत. नेत्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालय असलेल्या निजाम पॅलेसमध्ये पोहोचल्या आहेत. गेल्या दीड तासापासून त्या निजाम पॅलेसमध्ये असून या परिसरात टीएमसी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने जमावाला पांगवण्यासाठी केंद्रीय वाहिनीच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. या जवानांनी टीएमसी कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या जवानांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे. या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकार आणि सीबीआय विरोधात हा संघर्ष सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी मंत्री आणि आमदारांना अटक करण्यासाठी सीबीआयने परवानगी घेतली नसल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही सदस्याला अटक करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. त्या शिवाय अटक करता येत नाही. त्यामुळे सीबीआयने मंत्री आणि आमदारांची केलेली अटक बेकायदेशीर आहे, असं ते म्हणाले.
इकडे ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालयात दाखल झालेल्या असतानाच नारदा प्रकरणी राज्यपाल जगदीप धनखड यांनी खटला भरण्याची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ टीएमसी कार्यकर्त्यांनी राजभवनला घेराव घातला आहे. राजभवनाच्या नॉर्थ आणि साऊथ गेटवर उभं राहून टीएमसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. राज्यपाल पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तर टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. आपला कोर्टावर पूर्ण भरोसा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये 2016च्या निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014मध्ये हे टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक कंपनीकडून कॅश घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या चार नेत्यांचीच नावे नव्हती, तर भाजपमध्ये सामिल झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे होती.

Leave a Reply